मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे आज ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी वामशी रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचनही करण्यात आले.
यावेळी बोलताना वामशी रेड्डी म्हणाले की, सध्या देशातील वातावरण गढूळ झाले असून सर्वजण भितीच्या सावटाखाली जगत आहेत. संविधान मोडीत काढण्याचा डाव आखला जात असून हा कुटील डाव हाणून पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला. स्वातंत्र्यसैनिकांच्या सर्वोच्च त्यागामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ते म्हणाले. रेड्डी यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेश वाचून दाखवला आणि हा संदेश तळागाळापर्यंत पोहचण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले तर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. हुसेन दलवाई, सरचिटणीस ऍड. गणेश पाटील, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, यशवंत हाप्पे, राजन भोसले, डॉ. गजाजन देसाई, माजी आमदार सुभाष चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजाराम देशमुख, सचिव झीशान अहमद यांच्यासह सेवादल आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.