Published On : Fri, Mar 26th, 2021

होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरी करा – जिल्हाधिकारी संदीप कदम

Advertisement

होळी, धुलीवंदन व रंगपंचमी-2021 मार्गदर्शक सुचना.

भंडारा:- कोविड-19 च्या अनुषंगाने या वर्षी सर्व धर्मिय सण, उत्सव तसेच मोठया स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या भंडारा व लगतच्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होतांना दिसत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वानी मोठया प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्यामुळे उदभलेल्या परिस्थतीचा विचार करता यावर्षी होळी, धुलीवंदन व रंगपंचमी चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. होळी, धुलीवंदन व रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

· होळी-शिमगा हा सण संपुर्ण भंडारा जिल्ह्यात मोठया उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 28 मार्च 2021 रोजी होळीचा सण आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहाता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण-अतिशय साधेपणाने साजरा करावा.

· 29 मार्च 2021 रोजी धुलिवंदन व 02 एप्रिल 2021 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेंकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलीवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करणे आवश्यक आहे.

· होळी-शिमगा निमित्ताने खास करुन पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठीकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

· होळी, धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करु नयेत. जिल्हास्तरावर यापुर्वी शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी सुधारणेसह निर्गमीत करण्यात आलेले आदेश व जिल्हास्तरावर निबंध घातलेले सर्व आदेश लागु राहतील. कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसुल विभाग, आरोग्य विभाग तसेच संबंधित नगरपालिका-नगर पंचायत, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी सदर परिपत्रक अन्वये कार्यवाही करावी.

सदर आदेशाचे पालन न करणारी अथवा उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवसथापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार अपराध केला असे मानन्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमुद केले आहे.