Published On : Fri, Mar 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

होळी साजरी करा जपून; महावितरणचे आवाहन

Advertisement

नागपूर: आनंद, उत्साह आणि उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा होतो. आयुष्यात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून. आपली आणि इतरांचीही काळजी घेत रंग उधळले, तर रंगपंचमी नक्कीच आनंददायक होऊ शकेल. होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहीत्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरू शकते.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

होळीच्या रात्री बरेचदा रस्त्यावर होत असलेल्या हुल्लडबाजीचा फटका परिसरातील वीज ग्राहकांनाही होत असतो, बेधुंद वाहन चालकांमुळे अनेकदा वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्यासोबतच जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यासोबतच नियोजित कार्यक्रमस्थळी वीज उपकरणांची योग्य तपासणी करून घ्या, उत्सवप्रिय जमतेच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना टाळून त्यांना होळीचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते वीजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. वीज वितरण यंत्रणेचे रोहीत्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावर रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेचा खांबांना स्पर्श करू नका. वीजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात होळी खेळताना वीज मिटर, वीजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने वीजेच्या बटनांना स्पर्श करू नका. होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा सण साजरा करून आनंद व्दिगुणीत करा. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता 24 तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक 1912, 19120, 18002123435 किंवा 18002333435 यावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरनच्या वतीने करण्यात आले आहे.

सुरक्षित आणि आनंदी होळी!

होळी आणतांना तीचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये.
विजेच्या खांब आणि वीजवाहिन्या पासून दूर रहा.
वीज वितरण यंत्रणा पासून लांब अंतरावर होळी पेटवा.
वीज वाहिन्या, वितरण रोहीत्रांवर पाणी फेकू नका.
रंगीत पाणी वीज उपकरणांवर टाकू नका.
ओल्या हाताने वीज उपकरणांना स्पर्श करू नका.
वीज खांबाभोवती पाण्याचा निचरा करु नका.
वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या तात्काळ मदत कक्षाला संपर्क साधा.

Advertisement
Advertisement