Published On : Sat, Aug 22nd, 2020

साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा, विघ्नहर्ता बना!

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर : परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेला गणेशोत्सव यंदा कोरोनाच्या छायेत आलेला आहे. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा. घरीच राहा. गणेशाचे आगमन होताना दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी जाऊ नये आणि विसर्जन घरीच करावे. हे सर्व करून आपणच विघ्नहर्ता बनावे आणि कोरोनाचे संकट या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दूर करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणातात, यावर्षी संपूर्ण मानवजातीवरच कोरोनाचे विघ्न आले आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव शक्यतोवर कौटुंबिक पद्धतीने, कौटुंबिक वातावरणात साजरा करून हे कोरोनाचे विघ्न दूर करायचे आहे. शक्यतोवर हा सण फक्त घरीच करायचा आहे. सार्वजनिक रूपात सण साजरा करणे टाळावे. गणपती दीड दिवसाचा असेल, पाच दिवसाचा असेल अथवा दहा दिवसाचा असेल, शहरातील प्रत्येकाने गणेशाचे विसर्जन घरीच करावे.

ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना मागीलवर्षीप्रमाणेच यंदाही मनपा राबवित आहे. फोन केल्यास विसर्जन रथ आपल्या घरापर्यंत येईल, अशी ही व्यवस्था राहील. काही ठिकाणी कृत्रिम टँक उभारण्यात येत आहे.

तेथेही विसर्जन करायला जात असाल तर केवळ आणि केवळ दोनच व्यक्तींनी विसर्जनाकरिता जावे. जर श्रीगणेशाला आपण विघ्नहर्ता म्हणत असेल, त्यांच्यावर श्रद्धा असेल तर ह्या गोष्टी पाळून स्वत: विघ्नहर्ता बनायचे आहे. ‘व्हर्च्युअल गणेश’ याची सुद्धा प्रॅक्टीस आपल्याला करायची आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडू नका, मिरवणूक काढू नका. कौटुंबिक वातावरणात गणेशोत्सव साजरा करा आणि कोरोनाचे संकट दूर पळवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.