Published On : Sat, Sep 2nd, 2017

गणेशोत्सव सामाजिक उत्सव म्हणून साजरा करा- देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: सावर्जनिक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजाला एकत्रित आणण्यासाठी केली. या गौरवशाली परंपरेनुसार सामाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हा उत्सव सामाजिक उत्सव म्हणून साजरा करावा. तसेच गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक एकता व एकात्मता कायम ठेऊन सर्वांना सोबत घेऊन या उत्सवातील आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. तसेच सार्वजनिक गणेश मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या आकर्षक व कलात्मक देखाव्यांची पाहणी केली. तसेच सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडे लेआऊट येथे उत्कर्ष सांस्कृतिक मंडळाच्या गणेश मंडळाला भेट दिली. यावेळी श्री. पियुष जोशी व सहकाऱ्यांनी स्वागत केले. भेंडे लेआऊट येथे श्री सिद्धीविनायक फाऊंडेशन तर्फे श्री सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळातर्फे भव्य व आकर्षक असा शिवसृष्टी देखावा तयार केला असून या देखाव्याच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवसृष्टी भव्य मंडपामध्ये साकारण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचे राज्यभिषेकापर्यंतच्या जीवनचरित्रावर आधारित देखावे साकारण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टी देखाव्याचे पाहणी केल्यानंतर अभिप्राय व्यक्त करतांना श्री गणेशाच्या सोबत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महारांजाचा इतिहास देखाव्याच्या स्वरुपात अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने साकारण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भासह बाहेरुनही भाविक मोठया संख्येने येथे भेट देतील.तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवकालीन पगडी घालून स्वागत
करण्यात आले. यावेळी आमदार समीर मेघे, सत्तापक्ष नेते संदिप जोशी, मंडळाचे संकेत टोके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री कार्पोरेशन कॉलनी गणेशोत्सव मंडळ, रामदास पेठ फार्मलॅण्ड, गणेशोत्सव मंडळ, पूर्व लक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळ, एकात्मता नगर येथील नवयुवक गणेश मंडळ, गोरले लेआऊट येथील गणेश मंडळ, स्वरस्वती विहार कॉलोनी येथील गणेशोत्सव मंडळ, एनआयटी कॉलोनी येथील साहस गणेश मंडळ, इमामबाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल जवळील गणेशोत्सव मंडळ, भगवाननगर येथील युवा गणेशोत्सव मंडळ, रेल्वे सुरक्षा गणेशोत्सव मंडळ, छत्रपतीनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी मंडळास भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.