Published On : Mon, Apr 22nd, 2019

पर्यावरणविषयक जनजागृतीने वसुंधरा दिवस साजरा

मनपा-ग्रीन व्हिजील-अर्थ डे नेटवर्कचे आयोजन : चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये साधला नागरिकांशी संवाद

नागपूर महानगरपालिका, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने सोमवारी (ता. २२) स्थानिक चिल्ड्रेन पार्क येथे नागरिकांशी संवाद साधण्यात आला. पोस्टर्स आणि संवादाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने वसुंधरा दिवस साजरा केला.

यावर्षी वसुंधरा दिवसाची थीम ‘प्रोटेक्ट अवर स्पेसीस’ असून याअंतर्गत ग्रीन व्हिजील पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी आकर्षक पोस्टर्स आणि विविध संदेशांच्या माध्यमातून जनजागृती केली. स्थल व जल परितंत्र आणि त्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या प्रजातींच्या प्राण्यांची सध्याची परिस्थिती आणि त्यांचे संरक्षण याबद्दल नागरिकांसोबत चर्चा केली. याव्यतिरिक्त नैसर्गिक संपदांचे संरक्षण, ऊर्जा बचत, कचऱ्याचे वर्गीकरण, पर्यावरण अनुकूल जीवन शैलीला अंगिकारणे, प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण व नुकसान अशा पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यांवरही नागरिकांशी संवाद साधला.


नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्या मार्गदर्शनात झालेल्या अभियानात धरमपेठ झोनचे झोनल आरोग्य अधिकारी दीनदयाल टेंभेकर, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र शेट्टी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी आणि अर्थ डे नेटवर्क इंडियातर्फे अलिकडेच नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयक सुरभी जैस्वाल उपस्थित होत्या. अर्थ डे नेटवर्कच्या भारताच्या आणि दक्षिण आशियाच्या संचालक करुणा सिंह यांनी मनपा आणि ग्रीन व्हिजीलच्या कार्याची प्रशंसा करीत पर्यावरणाप्रति जागरुक असलेल्या शहरांमध्ये नागपूर एक असल्याचा गौरवोल्लेख केला.

अभियानाच्या यशस्वी आयोजनाकरिता ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, टीम लीडर तथा अर्थ डे नेटवर्कच्या समन्वयक सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णूदेव यादव, शीतल चौधरी, विकास यादव, कार्तिकी कावळे, दादाराव मोहोड, सारंग मोरे, रुता धर्माधिकारी, वैभव पांडे, इंद्रायणी ठाकरे, चिन्मय धिमान, प्राजक्ता पुसदकर आदींनी सहकार्य केले.

का साजरा करण्यात येतो वसुंधरा दिवस?
सन १९६९ मध्ये कॅलिफोर्नियाच्या संत बारबराच्या समुद्र किनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात तेल गळती झाली. यामुळे व्यथित झालेले अमेरिकेचे पूर्व सिनेटकर गेलॉर्ड नेल्सन (Gaylord Nelson) यांनी पर्यावरण आपत्तीपासून बचावासाठी काहीतरी करण्याचे ठरविले. त्यांनी अर्थ डे नेटवर्क नावाच्या संस्थेची स्थापना केली. ज्या माध्यमातून सन १९७० मध्ये अमेरिकेत सर्वप्रथम २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण जगभरातील १९५ देशांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो.