नागपूर: महायुती सरकारच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये जुलै महिन्यापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या उपक्रमासाठी महापालिकेने २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे.
महापालिकेच्या ११६ शाळांमध्ये (८८ प्राथमिक व २८ माध्यमिक) हे कॅमेरे बसवले जातील. यामुळे विद्यार्थ्यांसह शाळेच्या इमारती व साहित्याची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.
शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प गत शैक्षणिक सत्रापासून सुरू झाला आहे. २८ माध्यमिक शाळांपैकी २५ शाळांमध्ये सीसीटीव्हीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शाळांमध्ये जुलैपर्यंत कॅमेरे बसवले जातील.
या कॅमेर्यांचे नियंत्रण संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षण अधिकाऱ्यांकडे राहील. शिवाय सर्व शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेर्यांची नोंद व नियंत्रण एका केंद्रीय नियंत्रण कक्षामार्फत ठेवण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शाळांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता कमी होईल आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर सातत्याने लक्ष ठेवता येईल.