नागपूर : नागपूर शहरातील देशी व विदेशी दारू दुकानांमध्ये सुरू असलेल्या चोऱ्यांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी भागात ही घटना घडली आहे. येथील वर्षा वाईन्स नावाच्या देशी दारू दुकानात झालेल्या चोरीत चोरट्याने तब्बल ९ लाख रुपयांवर डल्ला मारला, यातील ६ लाख रुपये फक्त विविध नाण्यांच्या स्वरूपात असल्याची माहिती समोर आली आहे.
दुकानाचे मालक संजय जायसवाल यांच्या म्हणण्यानुसार, दुकानात दररोज मोठ्या प्रमाणावर ₹५, ₹१० व ₹२०च्या नाण्यांत व्यवहार होतो. हे सर्व नाणे पिशव्यांमध्ये साठवून ठेवले जात होते. याच पिशव्या चोराने बोरीत भरून लंपास केल्या. याशिवाय ₹२ ते ₹३ लाखांची रोख रक्कमही चोरीस गेली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या जड नाण्यांची चोरी एकट्याने कशी केली? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच, सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त एकच चोर दिसून आला आहे. तो बोरीमध्ये नाण्यांची पॅकेट्स भरताना स्पष्टपणे दिसतो. पोलिसांना शंका आहे की, त्याने दुकानापासून थोड्या अंतरावर वाहन उभं केलं होतं आणि तिथून तो पसार झाला.
या चोरीची पद्धत याआधी प्राईड बार आणि चाणक्य बारमध्ये झालेल्या चोरीसारखीच असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांना सर्व चोरींमागे एकाच चोराचा हात असावा अशी शक्यता वाटते. मिळालेल्या माहितीनुसार, चोराची ओळख पटली असून लवकरच त्याची अटक होण्याची शक्यता आहे.
शहरातील दारू दुकानांवर वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या चोरीमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सर्वांची नजर यावर आहे की, पोलिस ‘सिक्का चोर’ किती लवकर गजाआड करतात.