नागपूर – नागपूर ग्रामीण भागातील प्रसिद्ध द्वारका वॉटरपार्कमध्ये सुरक्षारक्षक आणि बाउंसरकडून एका कुटुंबीयांवर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्या घटनास्थळीच बेशुद्ध पडल्या. पीडित कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पाटणसावंगी पोलिसांनी संबंधित सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.
कामठी येथील साक्षी घारोटे, सोनाली शिंदे, विवेक शिंदे, पवन शिंदे, मयूर घाटोळे आणि त्यांचे दोन मित्र असे सात जण रविवार सकाळी वॉटरपार्कला गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास पार्क बंद होण्याच्या वेळेस, पार्कमधील एका सुरक्षारक्षकासोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर इतर सुरक्षारक्षक आणि बाउंसर घटनास्थळी आले आणि त्यांनी साक्षी घारोटे, सोनाली शिंदे, विवेक शिंदे, मयूर व शत्रू या पाच जणांवर हल्ला चढवला.
साक्षी आणि सोनाली यांना बेदम मारहाण करण्यात आली, इतकी की त्या जागीच बेशुद्ध झाल्या. या प्रकरणाचा एक व्हिडीओ घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.
पवन शिंदेने कामठीतील मित्राच्या मदतीने नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा संपर्क क्रमांक मिळवला आणि त्यांना थेट फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस प्रशासन जागे झाले आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू करण्यात आली.
दरम्यान, वॉटरपार्क प्रशासनाला पोलिस कारवाईची खबर लागताच त्यांनी साक्षी आणि सोनाली यांना इकोस्पोर्ट गाडीत टाकून पाटणसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सोडून दिले आणि स्वतः फरार झाले.
पाटणसावंगी पोलिस चौकीचे कर्मचारी तात्काळ रुग्णालयात पोहोचले आणि दोघींना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पाटणसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना खापा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असतानाही तिथून कोणतीही तातडीची मदत मिळाली नाही, असा सवाल पीडितांनी उपस्थित केला आहे.
गत आठवड्यातही घडला होता असाच प्रकार-
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याआधी देखील असाच प्रकार या वॉटरपार्कमध्ये घडला होता. मात्र, एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे खापा पोलिसांनी केवळ नावालाच कारवाई केली होती. त्यामुळेच सुरक्षारक्षक आणि बाउंसरांचा मनोबल वाढला असल्याचे बोलले जात आहे.
एका खोलीत एक तास बंद करून ठेवले-
बाउंसरांनी पीडित पाच जणांना वॉटरपार्कमधील एका खोलीत बंद करून सुमारे तासभर ठेवले. यावेळी पवन शिंदे आणि मयूर घाटोळे यांनी अनेकदा विनवण्या केल्या की साक्षी आणि सोनाली बेशुद्ध आहेत, कृपया त्यांना मदत करा. त्यांनी खापा पोलिस स्टेशन आणि डायल 112 वर फोन करून मदतीची विनंती केली, मात्र कोणतीही मदत मिळाली नाही. प्रशासनाकडून चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.