Published On : Sat, Oct 3rd, 2020

कॅन्सर रुग्णांसाठी काळजी आणि सुरक्षा हाच उपाय

‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ.सुशील मंधानिया आणि डॉ.स्मिता पाखमोडे यांचा सल्ला

नागपूर: कोव्हिडपासून दूर राहण्यासाठी आणि कोव्हिड झाल्यास लवकर बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. अशात कर्करोग (कॅन्सर) असलेल्या रुग्णांना जास्त धोका आहे. कोव्हिडमध्ये मृत्यू होणा-यांमध्ये कर्करोगबाधितांची संख्या मोठी आहे. कर्करोग्यांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते अशा स्थितीत रुग्णाला कोरोना झाल्यास धोका आणखी वाढतो आणि मृत्यूची शक्यताही वाढते. त्यामुळे कर्करोगबाधितांनी कोरोनापासून बचावासाठी परिवारातील सदस्यांनी स्वत:ची आणि रुग्णाची सुरक्षेच्या नियमांचे योग्य पालन करून काळजी घेणे हाच उत्तम उपाय आहे, असा सल्ला प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मंधानिया, एनकेपी सिम्स अँड आरसी च्या बायोकेमेस्ट्री विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ.स्मिता संजय पाखमोडे यांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शनिवारी (ता.३) डॉ. सुशील मंधानिया आणि डॉ.स्मिता पाखमोडे यांनी ‘कोव्हिड आणि कॅन्सर’ या विषयावर मार्गदर्शन केले व नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसरन केले.


कोव्हिडची कर्करोगग्रस्त आणि सामान्य रुग्णांमध्ये सारखीच लक्षणे दिसून येतात. कर्करुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना संभाव्‍य धोका लक्षात घेता जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. जगात भारतातील कर्करुग्णांच्या मृत्यूचा दर सर्वाधिक आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे उशीरा झालेले निदान हे आहे. आपल्याकडे नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने अनेक जण उशीराच डॉक्टरांकडे जातात. कोणत्याही प्रकारचा मोठा त्रास नसल्याने लोक दुर्लक्ष करतात व त्या काळात कर्करोग वाढतो. त्रास वाढल्यानंतर जेव्हा डॉक्टरांची धाव घेतली जाते तोपर्यंत उशीर झालेला असतो. हीच बाब कोव्हिडमध्येही दिसून येत आहे. अनेक रुग्ण सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही चाचणी करीत नाही. त्यामुळे कोव्हिडचा संसर्ग वाढत असतो. लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे समाजात अनेक लोक बाधित होत आहेत. त्यामुळे थोडाही संशय वाटल्यास तात्काळ चाचणी करा. लवकर निदान त्वरीत उपचार हे कोव्हिडमध्ये अत्यावश्यक आहे, असेही डॉ. सुशील मंधानिया आणि डॉ.स्मिता पाखमोडे म्हणाले.

कर्करुग्णाने घ्यावयाच्या काळजी संदर्भात बोलताना डॉ. सुशील मंधानिया म्हणाले, एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान झाल्यास आपल्याकडे सर्व नातलग डॉक्टरांची भूमिका बजावतात. रुग्णाला भेटण्यासाठी गर्दी करतात, हॉस्पिटलमध्येही गर्दी होते, रुग्णासोबतच जेवण करत असल्याचेही प्रकार घडतात. आजच्या घडीला या सर्व धोकादायक बाबी आहे. त्यामुळे या कटाक्षाने टाळा. आज आपल्याला आपली जीवनशैली, आपल्या सवयी बदलविण्याची गरज आहे. रुग्णाला भेटायला येणे टाळावे शक्यतो फोनवरूनच संवाद साधावा, रुग्णासोबत असलेल्या काळजी घेणा-या व्यक्तीने त्याच्यासोबत बोलताना योग्य अंतर राखावे, दोघांनीही मास्क लावणे बंधनकारक आहे. कर्करुग्णाचे ‘रेडियशन’ करताना रुग्णाला कोव्हिडचा धोका बळावू शकतो. त्यामुळे ‘रेडियन’ करताना रुग्णाने आणि इतर सर्वांनीही मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोव्हिडच्या या संसर्गाच्या काळात कर्करुग्णांनी काळजी घेतानाच त्यांची काळजी घेणा-या सर्वांनीच आणि त्यासह सर्वच सर्वसामान्या नागरिकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर ही त्रिसूत्री आज प्रत्येकाने आपल्या जीवनातील अंग बनवून घ्यावे. विशेष म्हणजे, या त्रिसूत्रीचा वापर योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. घरी आणलेल्या भाज्या धुणे, दरवाजे, हँडल आणि इतर वारंवार स्पर्श होणा-या वस्तूंचे आपण जेवढे जबाबदारीने निर्जंतुकीकरण करतो तेवढेच दुर्लक्ष मास्ककडे करतो. ही महत्वाची बाब आहे. मास्क हे कोव्हिडपासून बचावाचे मोठे अस्त्र आहे. मास्क लावल्यानंतर त्याला हात लावू नये, तो लावल्यास लगेच हँडसॅनिटायजरने हात निर्जंतुक करावे, असा सल्लाही डॉ. सुशील मंधानिया आणि डॉ.स्मिता पाखमोडे यांनी दिला.