Published On : Tue, May 3rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

लोकसहभागातून मोकाट कुत्र्यांची नसबंदी होऊ शकेल का?

माजी महापौर संदीप जोशी यांची मनपा आयुक्तांशी चर्चा

नागपूर: मोकाट कुत्र्यांच्या हैदोसामुळे नागपूर शहरातील सर्वच भागातील नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांवर या मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने अनेक जण जखमी झाले. शहरात अशा घटना रोजच घडत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या मागे ही मोकाट कुत्री धावत असल्याने अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रस्ते, पाणी, वीज या भौतीक सुविधांच्या समस्येकडे ज्या पद्धतीने बघितले जाते त्यापद्धतीने या समस्येकडे दुर्दैवाने बघितले जात नाही. त्यामुळे माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी सोमवारी (२ मे) नागपूर महानगरपालिकेमध्ये मा. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, पशु वै‌द्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांची भेट घेऊन चर्चा केली.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या देखील समस्या जाणून घेतल्या. सुरूवातीच्या काळात महानगरपालिकेद्वारे मोकाट कुत्र्यांना मारले जात होते त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या कमी दिसायची. परंतू त्यानंतरच्या काळात मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आता मोकाट कुत्री मारता येत नाही त्याऐवजी कुत्र्यांची नसबंदी करावी लागते. कुत्र्यांची नसबंदी करून नैसर्गिकरित्या कुत्र्यांची संख्या कशी कमी होईल यावर भर दिला जातो.

खासगी पशुवै‌द्यकीय दवाखान्यांमध्ये नसबंदीसाठी कुत्र्याच्या मादीला पाच हजार रुपये तर नर कुत्र्याला साडेतीन हजार रुपये खर्च येतो. शासनाने निश्चित केलेला दर १६०० रुपये एवढा आहे. श्री. संदीप जोशी महापौर असताना त्यांनी स्वत: विविध बैठका घेऊन यासाठी महत्वपूर्ण पुढाकार घेतला होता. ३ कोटी रुपयांचे प्रावधान देखील केले होते. परंतू दुर्दैवाने कोरोनामुळे हे प्रावधान व त्यानंतर झालेल्या निविदा यशस्वी होऊ शकल्या नाहीत. १६०० रुपये राज्य शासनाचे दर असले तरी ते देऊन नसबंदी करणेही कठीण आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिया करणे देखील कठीण आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूर शहराच्या आजूबाजुच्या ४ नगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका मिळून १८ कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे. हा निधी प्राप्त होण्यास वेळ आहे. तो पुढे होईलही. परंतू नागरिक म्हणून प्रत्येकाची देखील काही जबाबदारी आहे. अनेक जण कुत्र्यांच्या प्रेमापोटी कुत्र्यांचे खाणे पिणे करीत असतात. त्यामुळे सर्व जण एकत्र येऊन लोकसहभागातून मोकाट कुत्र्यांची नसबंदी करू शकतो का? किंवा शहरातील सेवाभावी संस्था यामध्ये मदत करू शकतात का? अशी देखील चर्चा मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी आणि माजी महापौर श्री. संदीप जोशी यांच्यामध्ये झाली.

मोकाट कुत्र्यांची समस्या मोठी असून यादृष्टीने उपाय म्हणून लोकसहभागातून नसबंदी करण्याच्या सूचनेचा सकारात्मरित्या विचार करू, असे माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी सांगितले. यामध्ये महानगरपालिका सुद्धा सकारात्मकरित्या सहकार्य करण्यास तयार असल्याचे मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यावेळी म्हणाले.

Advertisement
Advertisement