Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

रस्ता विचारला अन् चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याला लुटलं; बुटीबोरीत १.२६ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला!

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात रस्ता विचारणे एका दाम्पत्याच्या चांगलेच अंगलट आले. रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग करत भरदिवसा चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याकडील सुमारे १ लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पीडित दाम्पत्याच्या मुलीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. मात्र, घटनेनंतर तीन दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

माहितीनुसार, ५ जुलै रोजी सायंकाळी सुशांत हजारे हे पत्नी व मुलीसह कारने बुटीबोरीकडे जात होते. नागपूर-फुकेश्वर-बुटीबोरी मार्गावर रस्ता चुकल्याने त्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांकडे मार्ग विचारला. आरोपींनी रस्ता दाखविल्यानंतर काही अंतरावर कारचा पाठलाग करत वाहन अडविले.

यानंतर दोघांनी चाकूचा धाक दाखवत सुशांत हजारे यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. लुटलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १.२६ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चोरीनंतर आरोपी दुचाकीवरून हुडकेश्वरच्या दिशेने पसार झाले.

घटनेवेळी कारच्या मागील सीटवर बसलेल्या पीडितेच्या मुलीने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. या व्हिडिओमध्ये आरोपी चाकू दाखवत धमकावत असल्याचे स्पष्ट दिसत असून तो तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरला आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मार्ग बदलत तेथून पळ काढला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, घटनेनंतर तीन दिवस उलटूनही आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नसल्याने तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.