Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Mar 15th, 2021

  व्यवसायिकांनी लॉकडाऊन काळामध्ये प्रशासनाला सहकार्य करावे : -डॉ. नितीन राऊत

  15 ते 21 मार्च नागपूर शहरात कडक लॉक डाऊन

  नागपूर : नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व वस्त्यांमध्ये 15 ते 21 मार्च पर्यंत कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिक संघटनांनी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. या सर्व संघटनांनी नागरिकांच्या जिवित्वाला अधिक महत्त्व देत,या काळात प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

  नागपूरमध्ये सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दररोजचा आकडा हजारच्यावर गेला असून रस्त्यावरील व बाजारातील गर्दी कमी करणे महत्वाचे आहे. मात्र रुग्णसंख्या कमी करण्यासाठी किमान आठवडाभर लॉकडाऊन करण्याबाबत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे एकमत झाल्यानंतर गुरुवारी दुपारी या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. शहरातील नागरिक व व्यावसायिकांना पुरेसा दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. शनिवार-रविवार या दोन्ही दिवसात गरज नसेल तर घराबाहेर नागरिकांनी पडू नये असे आवाहनही करण्यात आले होते. तथापि, ही बाब पुरेशी नसल्याने सोमवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.या लॉक डाऊन काळात संचार बंदी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  या पार्श्‍वभूमीवर आज नागपूर रेसिडेन्सी हॉटेल शिष्टमंडळ, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ,कूलरनिर्मिती व्यवसायात असणारे व्यवसायिक, फुलांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक, तसेच बांधकाम व्यवसायिक, ऑरेंज सिटी स्टोन क्रशर असोसिएशन व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी या सर्व शिष्टमंडळाला एक आठवडा सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या जीवित्वास सर्वोच्च प्राथमिकता देणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागणार असले तरीही आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या सूचनेनुसार ही सक्ती करावी लागत आहे. व्यापक हीत लक्षात घेता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

  खनिजपट्टा मुदत वाढविण्यासाठी निवेदन
  कोविड -19 महामारीमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे उद्योगांवर अनेक निर्बंध आलेत. लॉकडाऊन व निर्बंधामुळे राज्यातील खाजगी व शासकीय बांधकामे बहुतांशी बंद होते. तसेच अजूनही या परिस्थितीत विशेष बदल झाला नाही. या सर्व बांधकामावर दगड, गिट्टी, मुरुम यांचा पुरवठा होत असतो. याशिवाय खाण उद्योगाला लागणारे मजूर प्रामुख्याने परप्रांतीय आहेत. लॉकडाऊनमुळे हे परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात परत गेले आहेत. यामुळे खनिज उद्योग पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल. बऱ्याच ठिकाणी खनिजपट्टाधारकांनी यंत्रसामुग्रीसाठी बँकांकडून कर्जही घेतले आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करुन खाण चालविण्यास लागणाऱ्या खनिजपट्टयाची मुदत त्या-त्या खनिजपट्टयाच्या समाप्ती तारखेपासून सरसकट एक वर्षांची मुदत वाढवून देण्यात यावी, असे निवेदन खाण उद्योजकांमार्फत ऑरेंज सिटी स्टोन क्रशर असोशिएनचे अध्यक्ष रमेश गिरडे यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द केले.

  लॉकडाऊन संचारबंदीसह
  तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकार्यालय सोबत बैठक घेऊन पोलीस व महसूल यंत्रणेला 15 ते 21 या काळामध्ये रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता रुग्णवाढीची कडी तोडण्यासाठी हा बंद कडेकोट ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले याशिवाय आरोग्य यंत्रणा निर्देश देताना त्यांनी या काळात लसीकरणाला गती देण्याचे ही निर्देश दिले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145