Published On : Thu, Apr 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कळमना परिसरात गोदाम फोडून चोरी; तरुणासह दोन अल्पवयीन ताब्यात, ५.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Advertisement

नागपूर : शहरातील कळमना परिसरात गोदाम फोडून रोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून १९ वर्षीय तरुणास अटक करण्यात आली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹५.५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आदित्य सुरेश डेलिकर (वय १९, रा. फवारा चौक, कुंभार मोहल्ला, डेप्युटी सिग्नल परिसर, कळमना) असा असून त्याच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ‘लाखोटिया सेल्स कॉर्पोरेशन’ नावाचे गोदाम डेप्युटी सिग्नल रेल्वे क्रॉसिंगजवळ आहे. २५ एप्रिल रोजी चार दिवसांची सुमारे ₹९.५५ लाखांची रोकड त्यांनी कार्यालयातील लाकडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून गोदाम कुलूपबंद केले होते. मात्र २७ एप्रिल रोजी गोदाम उघडले असता रोकड चोरीस गेल्याचे आढळले.

तपासादरम्यान कार्यालयाच्या केबिनजवळील वरच्या भिंतीवरील टिनशेड काढून आरोपींनी छतामार्गे आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कळमना पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. परिसरातील १० ते १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवण्यात आली.

Advertisement

त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ₹५,०४,९६० इतकी रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली ‘पॅशन प्लस’ मोटारसायकल (MH-40-K-9990) जप्त केली. या वाहनाची किंमत सुमारे ₹५० हजार असून एकूण जप्त मुद्देमाल ₹५.५४ लाखांच्या आसपास आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पीएसआय संतोषकुमार रामलोड, हेड कॉन्स्टेबल रविकुमार शाहू, हेड कॉन्स्टेबल प्रदीप पवार, कॉन्स्टेबल मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल गोहोकर यांचा समावेश होता.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.