Published On : Thu, Apr 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांची कारवाई, १००% रक्कम परत!

Advertisement

नागपूर : शहरात “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली घडलेल्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात नागपूर सायबर पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत फिर्यादीची संपूर्ण १३ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांविरुद्ध पोलिसांच्या सजगतेचा पुन्हा प्रत्यय आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका वयस्कर दाम्पत्याला अज्ञात आरोपींनी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या नावावर बँक खाते उघडण्यात आले असून त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आल्याचा खोटा आरोप केला. तसेच या व्यवहारात कमिशन घेतल्याचे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची भीती निर्माण करण्यात आली. “डिजिटल अरेस्ट” करण्यात येत असल्याचे सांगून आरोपींनी दाम्पत्याला सतत कॅमेऱ्यासमोर ठेवले आणि त्यांना मानसिक दबावाखाली ठेवले.

यानंतर “शासकीय खात्यात पैसे जमा केल्यास पडताळणी करून परत केले जातील” अशी बतावणी करून दाम्पत्याकडून तब्बल १३ लाख रुपये आरोपींनी आपल्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी तात्काळ नागपूर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३८/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तातडीने आर्थिक ट्रेल ट्रॅक करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर संपूर्ण रक्कम (१००%) फिर्यादीला परत मिळवून दिली.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या दिल्ली येथील कारागृहात असून त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल, सहआयुक्त नविनचंद रेड्डी, अपर आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे आणि त्यांच्या पथकाने केली.

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या “डिजिटल अरेस्ट” किंवा शासकीय खात्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या कॉल्सपासून सावध राहावे आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.