नागपूर : शहरातील नंगा पुतळा चौकात तीन युवकांना ‘टोईंग व्हॅन’च्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
दुचाकीवर बसलेला असताना सुद्धा दुचाकी उचलून कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅनच्या तीन कर्मचाऱ्यांनी वाहतूक पोलिसासमोरच युवकांशी वाद घातला. हा वाद चिघळल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.माहितीनुसार, शहरातील अनधिकृत पार्किंग केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना टोईंगच्या माध्यमातून उचलून नेण्यात येते.मंगळवारी १२ मार्चला नंगा पुतळा परिसरात अशीच कारवाई सुरु होती. दुचाकीवर युवक बसला असताना, तिथे टोईंग व्हॅन आली. व्हॅनमधून दोन कर्मचाऱ्यांनी आक्रमकपणे दुचाकीवर बसलेल्या युवकाला उतरवून वाहन व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला.
युवकाने नकार देताच व्हॅनमधील तीन कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान वाहतूक पोलीस याठिकाणी आले. मात्र या घटनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. तीन कर्मचाऱ्यांनी युवकाची दुचाकी ओढून घेत,ती पुन्हा खाली पाडली.
यादरम्यान या घटनेचा व्हिडिओ घेणाऱ्याचा मोबाइलही हिसकावला आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.या घटनेतील दुचाकीस्वाराने तीन कर्मचाऱ्यांविरोधात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नितीन तिवारींमार्फत तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. उशीरा रात्री या तीन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.