Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 2nd, 2015
  Vidarbha Today | By Nagpur Today Vidarbha Today

  बुलढाण्यात उभारणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा


  Press meet copy
  बुलढाणा।
  हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्हामुख्यालयी त्यांचे भव्य स्मारक असावे या भावनेतुन शहरातील शिवभक्तांनी एकत्र येत शिव छत्रपती स्मारक समितीची सर्वधर्म समावेशक समिती तयार केली असुन या समितीच्या माध्यमातुन शहरात शिवरायांचा अश्वरुढ असलेला 21 फुट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येणाऱ्या दोन वर्षात शहरातील संगम चौक परिसरात हा पुतळा आणि स्मारक तयार हाईल, अशी माहिती या समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

  1 जुलै रोजी शिव छत्रपती स्मारक समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती देण्यात आली. समस्त मानवजातीच्या शौर्याचे आणि ध्येयनिष्ठेचे प्रतिक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ, जिजाऊंचे माहेरघर सिंदखेडराजा आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला मातृतिर्थ जिल्हा म्हणुन ओळखले जाते. या मातृतिर्थ जिल्ह्याच्या मुख्यालयी शिवरायांचा आदर्श सातत्याने मिळत राहो, या उद्देशाने तेथे त्यांचे स्मारक निर्माण करण्याचा मानस शिव प्रेमींनी केला आहे. या समितीच्या गठणाबाबत माहिती देतांना समितीचे सचिव सुभाष मानकर म्हणाले की, स्वराज्याची चळवळ उभी करतांना जशी अठरागड जातींची विविध धर्मांची लोकं शिवरायांच्या सोबत प्राणपणाने लढली त्याच प्रेरणेतुन शहरातील सर्व शिवभक्तांनी एकत्र येत या समितीची स्थापना केली असल्याचे मानकर यांनी सांगितले.

  समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे, उपाध्यक्ष राजेश हेलगे, सहसचिव उमेश शर्मा, कोषाध्यक्ष डॉ.विकास बाहेकर तर सदस्यपदी अ‍ॅड. जयश्रीताई शेळके, कोमल झंवर, जालिंधर बुधवतय, पत्रकार अनिल म्हस्के, रणजितसिंह राजपूत, सुरेश चौधरी, रविंद्र पाटील, मिर्झा बेग, अशोक इंगळे, अजयकुमार लाहोटी, हरिष निर्मळ, ज्ञानदेव काटकर, मिलींद देशपांडे, सुनिल उदयकार, भारत शेळके, मंगेश बिडवे आदींची निवड करण्यात आली आहे. यावेळी माहिती देतांना समती अध्यक्ष तुकाराम अंभोरे यांनी सांगितले की, सदर स्मारक बनविण्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. लोकवर्गणीतुन हा निधी उभा केला जाणार असुन समितीने स्वत:हून वर्गणीची सुरुवात केली आहे. पुतळा बनविण्यासाठी देशातील कुशल कारागिरांचा शोध सुरु आहे. चेहऱ्यावरील हावभाव, अश्वाचा देखणेपणा, पुतळ्याच्या बाजुला शिवसृष्टी व शिवकालीन काही दृष्ये देखील साकारली जाणार आहेत. सदर पुतळा हा सर्वात देखणा आणि प्रेरणादायी असावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी डॉ.बाहेकर यांनी सांगितले. आतापर्यंत 10 लाख रुपयांचा निधी जमा झाला असुन अष्टधातूंचा पुतळा बनविण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागतो. लवकरात लवकरच स्मारकाचे काम पुर्ण करुन 19 फेब्रुवारी 2018 पर्यंत स्मारकाचे काम पुर्ण करण्याचा समितीचा प्रयत्न असल्याचे अ‍ॅड.जयश्रीताई शेळके यांनी सांगितले. शिवप्रेमींनी या स्मारकासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सदर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145