Published On : Fri, Jul 24th, 2015

बुलढाणा : विविध समस्या सोडवण्यासाठी अपंग कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन


Buldhana Andolan
बुलढाणा
। जिल्हा परिषदेत कार्यरत वर्ग तीन आणि चारच्या अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सुटल्याने गुरुवार, 23 जुलै रोजी येथील महराष्ट्र राज्य अपंग अधिकारी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या दरम्यान अपंग कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण करण्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

शासनाच्या निर्देशानुसार अपंग कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपये वाहन खरेदीसाठी तत्काळ सानुग्रह अनुदान देण्याबाबतचे आदेश आहेत. महराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदेमधील अपंग कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. परंतु प्राथमिक शिक्षण विभागाकडे पात्र 65 अपंग कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांपासून प्रस्ताव दाखल केले असून, एकाही कर्मचाऱ्या लाभ देण्यात आला नाही. तसेच वर्ग चारमधील अस्थीव्यंगाने पीडित अपंग कर्मचारीही लाभापासून वंचित आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या 75 पेक्षाही जास्त अपंग कर्मचाऱ्यांचे वाहन भत्ता प्रस्ताव प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहेत, असा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी तीन, वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची पदे भरताना पाच मार्च 2002 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करून सेवा ज्येष्ठता अपंग कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यात यावी, सामान्य विभागातील अपंगाच्या पदोन्नतीचा अनुशेष तत्काळ भरण्यात यावा आदी मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या धरणे आंदोलन शिवदास हुडेकर, अनिल चव्हाण, संजय पवार, रामदास मिरगे, शिवदास पडघान, गजन्नाथ निकम, किशोर गारोडे, राजेंद्र खेडेकर आदींनी सहभाग घेतला.