Published On : Sat, Jul 25th, 2015

बुलढाणा : पत्रकारास मारहाण करणाऱ्या संस्थाअध्यक्षावर गुन्हा दाखल करा

Attack on Journalist
बुलढाणा। भरधाव वेगाने करणाऱ्या स्कुल बसचे फोटो का काढले या कारणावरुन संस्थाध्यक्ष अब्दुल रहिम शेख बिराम यांच्यासह चार ते पाच जणांनी कुठलीही शाहानिशा न करता पत्रकार तथा महाराष्ट्र उर्दु पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष साबीर अली यांना जबर मारहाण केली. त्यामुळे बिना नंबरचे वाहन जप्त करुन मारहाण करणाऱ्या संस्थाध्यक्षावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी महराष्ट्र उर्दु पत्रकार संघटनेचे कासिम शेख यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

गेल्या 21 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता उर्दु एज्युकेशन सोसायटी बुलडाणाची मिनी स्कुल बस जयस्तंभ चौकातुन भरधाव वेगाने धाड नाक्याकडे जात होती. यावेळी सदर बसमध्ये 30 ते 35 लहान शाळकरी मुले जनावरासारखी कोंबलेली होती. भरधाव स्कुलबसचा अपघात होवु नये यासाठी पत्रकार साबीर अली यांनी सदर बस थांबवुन चालकास हळु बस चालविण्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विनानंबरच्या स्कुलबसचे फोटो बातमीसाठी काढुन घेतले. ही बाब चालकाने संस्थाध्यक्ष अब्दुल रहिम यांना सांगितली. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता पत्रकार साबीर अली हे इक्बालचौकात आले असता संस्थाध्यक्षासह चार ते पाच जणांनी कुठलीही शाहनिशा न करता त्यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर साबीर अली हे शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत.

बातमीसाठी फोटो काढणे हे अपराध नसुन विना नंबरची व विना पासिंगची स्कुल बसमध्ये लहान विद्यार्थ्यांना ने-आण करणे हे अपराध आहे. असे अपराध सदर संस्थेकडून होत आहेत व पोलिस फक्त बघ्याची भुमिका घेत आहे. पत्रकाराला मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला दाबण्याचा प्रयत्न आहे. सदर घटना घडून चार दिवसाचा कालावधी उलटुन गेला असतांना पोलिसांनी अद्यापही स्कुल बस ताब्यात घेतली नाही. त्यामुळे विनाकारण मारहाण करणाऱ्या संस्थाध्यक्ष अब्दुल रहिम शेख बिराम, शेख हमिद, शेख जकरिया यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करुन विनानंबरची स्कुल बस पोलिसांनी ताब्यात घेवुन योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी कासिम शेख यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.