सवडद गावावर शोककळा
बुलढाणा। नातेवाईकाचा अंत्यविधी अटोपुन घराकडे परतणाऱ्या सवडद येथील कुटूंबीयांच्या अॅपेला अपघात झाला. शुक्रवार 7 जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास अॅपे व टाटासुमो मध्ये धडक झाली. त्यात सवडद येथील देशमुख कुटूंबातील दोन सख्खे भाऊ मृत्यूमुखीपडले आहे. तर पाच जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
आज शनिवार 18 जुलै रोजी या अपघातात मृत्यू झालेल्या दत्तात्रय रामभाऊ देशमुख व गोपाळराव रामभाऊ देशमुख या दोन सख्या भावांवर सवडद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिखली जवळील खुपगाव येथुन अॅपे क्र.एम.एच.27/आर/1707 ने देशमुख कुटूंब व अन्य नातेवाईक सवडदकडे परत येत होते. दरम्यान बुलडाणा कडे जाणाऱ्या समाज कल्याण विभागाच्या टाटासुमोची व अॅपेची कोलारा फाट्यावर समोरा समोर धडक झाली. या अपघातात दत्तात्रय रामभाऊ देशमुख (45) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच विवेकानंद आश्रमाच्या रुग्णवाहिकेने आश्रमाचे सचिव आत्मानंद थोरहाते, प्रविण धनवे, सचिन लोखंडे, अमोल खेडेकर, दत्ता पैठणकर यांच्या मदतीने जखमींना चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. तर अत्यावस्थ असलेल्या गोपाळराव रामभाऊ देशमुख यांना औरंगाबाद येथे नेत असतांना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेत जखमी पेनटाकळी येथील तेजराव रामराव इंगळे (55), प्रतिभा पंजाबराव इंगळे (40), अॅपेचालक अनंता प्रल्हाद खरात (35), सवडद गंगुबाई गोपाळराव देशमुख (37) व गिताबाई दत्तात्रय देशमुख याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान या जखमींना बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात रात्री उपचारार्थ दाखल केल्यावर त्याठिकाणी डॉक्टरांची उपस्थिती नव्हती तसेच तेथुन पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यासाठी रुग्णवाहिका देखील नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
