Published On : Sat, Jun 23rd, 2018

बुलढाण्याची घटना महाराष्ट्राला कलंकीत करणारीः खा. अशोक चव्हाण

मुंबई: बुलढाण्यात पीककर्ज देण्यासाठी शेतक-याच्या पत्नीकडे बँक अधिका-याने शरीरसुखाची मागणी केल्याची घटना अत्यंत क्लेषदायक आणि महाराष्ट्राला कलंकीत करणारी आहे. याला सर्वस्वी सरकारची धोरणे आणि शेतकरी वर्गाबद्दली अनास्था कारणीभूत असून राज्यातील शेतक-यांची परिस्थिती अगतिक झाली आहे. त्यामुळे अशा त-हेचे शोषण यंत्रणांमार्फत केले जात आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण की, राज्यातल्या शेतक-यांना पीककर्ज देणे ही शासनाची जबाबदारी आहे. शेतक-याला सावकाराच्या दारात जावे लागू नये यासाठी वर्षानुवर्ष बँकां मार्फत शेतक-यांना पीककर्जाचा पुरावठा केला जातो. या सरकारच्या कालवधीत गेल्यावर्षी खरीप हंगामात उद्दिष्टाच्या केवळ 30 टक्के आणि रब्बी हंगामात फक्त 17 टक्के कर्जवाटप झाले होते. यावर्षीही 31 मे पर्यंत उद्दिष्टाच्या केवळ 11 टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात 10 टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप झाले आहे. शेतकरी बँकांच्या दारात याचकाप्रमाणे उभे आहेत. आता तर बुलढाणा जिल्ह्यातील दाताळा गावात बँक अधिका-याने शेतक-याच्या असाहयतेचा फायदा घेऊन त्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील आणि पुरोगामी राज्याला कंलकीत करणारी आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकरी सुरक्षित नाहीत हे स्पष्ट होते. आता शेतक-यांच्या कुटुंबातील महिलाही सुरक्षित नाहीत. यापूर्वी बीड जिल्ह्यातील एका खासगी सावकाराने शेतक-याची जमीन परत करण्यासाठी त्याची मुलगी आणि सुनेला आणून देण्याची मागणी केली होती. या घटना पाहिल्यावर राज्यातील शेतक-यांना सरकारने किती असहाय आणि हतबल केले आहे हे दिसून येते. राज्याच्या इतिहासात शेतक-यांची एवढी वाईट अवस्था कधी नव्हती ती भाजप सरकारने केली आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.

एकीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, कर्जमाफीतून जवळपास 50 लाख शेत-यांना वगळले, निसर्गाच्या अवकृपेमुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मंत्रालयाचे रूपांतर आत्महत्यालयात झाले आहे. या सरकारने सामान्य शेतक-यांचे जगणे पूर्णपणे कठीण करून टाकले आहे. हे अतिशय वेदनादायी चित्र पाहून मुख्यमंत्र्यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? या प्रश्नाचे उत्तर आता दिले पाहिजे असे खा. चव्हाण म्हणाले.

बड्या उद्योगपतींची अडीच लाख कोटींची कर्ज माफ केली जात आहेत. तर निरव मोदी, विजय माल्यासारखे धनदांडगे बँकांचे लाखो कोटी रूपये बुडवून सरकारच्या मदतीने परदेशात जात आहेत. तर दुसरीकडे अवघ्या काही हजारांसाठी बळीराजा देशोधडीला लागला आहे, असे विदारक चित्र भाजप सरकारच्या काळात देशात आहे. याला सर्वस्वी भाजप शिवसेनेचे सरकार जबाबदार आहे. दोषी बँक अधिका-यांवर फक्त गुन्हा दाखल करून चालणार नाही तर त्यांना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.