Published On : Mon, Feb 1st, 2021

शेती, शिक्षण, आरोग्याला बळकटी देणारा अर्थसंकल्प : भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम

Advertisement

नागपूर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश पोखरून निघाला अशा स्थितीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प हा शेती, शिक्षण आणि आरोग्य यंत्रणेला बळकटी देणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश सचिव तथा पॅनलिस्ट ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिली. कोव्हिडच्या काळात सर्वत्र मंदीची लाट असताना सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

२०१२ मध्ये शेतकऱ्यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, २०१५ मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटी वाढविण्यात आलेला आहे. गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरिता तरतूद आहे. १ हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन यंत्रणेशी जोडणारा हा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तूत्य आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट अशी २ लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती. याशिवाय करोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी भागात ७५० ‘एकलव्य’ शाळा उभारण्याचा संकल्प व प्रत्येक शाळेकरिता ३८ करोड रू ची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अनुसूचित जातीतील ४ करोड विद्यार्थ्यांच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता ३५००० करोड रू. ची तरतूद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही बाब नागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची आहे. अर्थमंत्र्यांच्या या भेटीमुळे नागपूर शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वासही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

एकूणच शेतकरी, उद्योजक यासह अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थी आणि नागरिकांच्या हिताचा पुरेपूर विचार करून सर्वसमावेश अर्थसंकल्प केंद्र सरकारद्वारे मांडण्यात आलेले आहे. या अर्थसंकल्पाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आहेत.