Published On : Wed, Oct 14th, 2020

ब्रॉड गेज मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी

Advertisement

• ब्रॉड गेज मेट्रो: अश्या प्रकारची देशातील ही पहिलीच सेवा

 

 

नागपूर  : आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने महा मेट्रोच्या ब्रॉडगेज (बीजी) मेट्रो प्रस्तावाला मंजुरी दिली. रु. ३३३.६० कोटीचा हा प्रकल्प नागपूर – नरखेड, वर्धा, भंडारा आणि रामटेक या सभोवतालच्या सॅटेलाईट शहरांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यार आहे. राज्य मंत्रिमंडळाने सदर प्रस्ताव मंजूर केल्याने आता केंद्र सरकारकडे मंजुरीकरिता राज्य शासनाकडून पाठविल्या जाणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर मेट्रोचे डबे भारतीय रेल्वेच्या रुळावर धावताना दिसेल.

प्रास्तवित ब्रॉड गेज मेट्रो प्रकल्प महा मेट्रोचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यामुळे नागपूर व परिसरातील वाहतुकीची पद्धत बदलणार. या प्रकल्पाचे मुख्य उद्दीष्ट नागपूर आणि चार उपग्रह शहरा दरम्यान वातानुकूलित, वेगवान, विश्वासार्ह आणि आरामदायक सेवा प्रदान करून भारतीय रेल्वेच्या विद्यमान पायाभूत सुविधांचा उपयोग करणे आहे. देशात अश्या प्रकारची हि पहिलीच सेवा असेल.

उच्च दर्जाची सेवा: सदर ब्रॉड गेज मेट्रो प्रकल्प नागपूर मेट्रोची फीडर सेवा म्हणून काम करेल, त्यामुळे खाजगी वाहने व परिवहन सेवांवरील अवलंबन कमी होईल.त्याचबरोबर रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल व रस्त्यावरील अपघात व प्रदूषण कमी होईल. चार मार्गिका असलेल्या प्रकल्पाचे एकूण अंतर २६५ किमी एवढे आहे.

जुलै २०१८ मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी: भारतीय रेल्वे, महाराष्ट्र सरकार आणि महा मेट्रो यांच्या दरम्यान १६ जुलै २०१८ रोजी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी आणि श्री पीयूष गोयल यावेळी उपस्थित होते.

राज्य सरकार आणि रेल्वेचे आभार : ब्रॉड गेज मेट्रोचा प्रस्ताव पुढे नेण्यास भारतीय रेल्वेने महत्वाची भूमिका बजावली. महा मेट्रोने भारतीय रेल्वे व महाराष्ट्र सरकारचे ब्रॉड गेज मेट्रो प्रकल्पाच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

प्रवासाचा वेळ कमी होणार: नागपूर ते वर्धा दरम्यान प्रवासासाठी २.२५ तासांचा कालावधी लागतो. या तुलनेत प्रस्तावित सेवेच्या माध्यमाने फक्त १. १० तासांत हा प्रवास शक्य होईल. अशाप्रकारे, नवीन सेवा सुरू केल्याने केवळ वेळेची बचत होणार नाही, तर प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येईल व अपघात टाळता येईल, विशेषत: जे प्रवासी रस्त्याने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.

ट्रेनची गती असणार १२० कि.मी. प्रति तास : महा मेट्रोच्या गाड्या १२० कि.मी. प्रति तास वेगाने जलद गतीने धावतील सर्व सोई-सुविधा असलेले आधुनिक कोच चार ठिकाणांमधील प्रवाशांना वाहतूक पुरवेल.सुरुवातीला चार ठिकाणाना जोडण्याकरिता चार गाड्याची सेवा असेल व हळूहळू या संख्येमध्ये वाढ होईल तसेच ठराविक कालावधीनंतर ते आठ पर्यत जाईल.

प्रकल्पाला वित्त पुरवठा करण्याकरीता केएफडब्ल्यू तयार: बीजी मेट्रो प्रकल्प नागपूर मेट्रोला फीडर सर्व्हिस सेवा म्हणून काम करण्यास मददगार ठरेल व सध्याची प्रवासी वाहतूक मध्ये वाढ होणास फायदेमंद होईल. महा मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाला वित्तपुरवठा करणार्याा आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था एजन्सी – केएफडब्ल्यू ने बीजी मेट्रो प्रकल्पाला एकूण ३०५.२० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यास तयार आहे.

सदर प्रकल्पाच्या अंबलबजावणीकरीता राज्य शासनाचे सहाय्य म्हणून केंद्र शासनाच्या कराच्या ५०% (रु. ७. १० कोटी) आणि राज्य शासनाच्या कराच्या १००% ( रु. १४.२० कोटी) अशी एकूण रक्कम रु. २१.३० कोटी राज्य शासनाने मंजूर केली आहे व उर्वरित वाटा केंद्र शासनाचा असेल.
सदर प्रकल्पामुळे नागपुरात जाण्याचा मार्ग बदलेल यामुळे केवळ नागपूरच नव्हे तर देशभरातील अग्रणी प्रकल्प म्हणून वाहतूक संकल्पनेतही क्रांती घडून येईल.