Published On : Fri, Jul 20th, 2018

बीपीएमएस करणार इमारत बांधकाम परवानगीचे काम सुलभ

नागपूर: केंद्र शासनाच्या सुलभ व्यवसाय उपक्रमा अंतर्गत राज्य सरकारने नगरपरिषद, महानगरपालिका व संबंधीत नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणा-या विविध परवानगी प्रकरणात एकसुत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लान मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल येत्या २५ जुलैपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून डिजिटल इंडियाचा नारा देण्यात येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे अनेक कामांमध्ये वेळ वाचत आहे. इमारत बांधकाम परवानगीच्या कामासाठी बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या बीपीएमएस पोर्टलमुळे इमारत बांधकाम परवानगीचे कार्य अधिक सुलभ होईल व वेळही वाचेल, असा विश्वास मनपाचे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेद्वारे ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्यासाठी ‘महा-आयटी’ संस्थेच्या बीएमपीएस सॉफ्टवेअरचे शुक्रवारी (ता. २०) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती श्री. कुकरेजा बोलत होते.

याप्रसंगी स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, उपायुक्त राजेश मोहिते, नगररचनाकार श्रीकांत देशपांडे यांच्यासह शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. कुकरेजा म्हणाले, राज्य शासनातर्फे ‘लाँच’ करण्यात आलेल्या पोर्टलमुळे सर्वांचे काम सुलभ होणार आहे. नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे काही अडचणी येणे स्वाभाविक आहे. मात्र या तंत्रज्ञानामुळे इमारत बांधकाम परवानीसाठी अनेक दिवस पडून राहणा-या फाईलचा त्रास कमी होणार आहे.

शिवाय कामामध्ये पारदर्शिताही येईल. याचा पुढे होणारा फायदा लक्षात घेऊन याचा स्वीकार करा, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्य सरकारने सुरू केलेले पोर्टल दिर्घकाळासाठी आपणास उपयोगी ठरणार आहे. बीपीएमएस सॉफ्टवेअरचा यापुर्वी अनेक नगरपरिषदांनी स्वीकार केला आहे. या तंत्रज्ञानात येणा-या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी उद्या शनिवारी (ता. २१) महापौर नंदा जिचकार व आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत सर्व वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होउन अडचणी मांडाव्यात असे आवाहन स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी केले.