Published On : Sat, Nov 21st, 2020

बॉम्ब शोध नाशक पथकाचे जनजागृृती अभियान

– नागपूर, इतवारी, कामठी स्थानकावर

नागपूर : अनलॉकिंग आणि ‘बिगिन अगेन’ नुसार तब्बल तीन महिने बंद असलेल्या प्रवासी रेल्वे गाड्या टप्प्याने रुळावर धावत आहेत. प्रवाशांची गर्दीही वाढत आहे. मात्र अलिकडच्या काळात फक्त कोरोना वायरसवर लक्ष असलेल्या प्रवाशांचे बॉम्ब तसेच बेवारस बॅगबाबत दुर्लक्ष झालेले आहे. याचा फायदा घेत घातपाताची मोठी घटना घडू शकते. हे हेरून बॉम्ब शोध नाशक पथकाने रेल्वेस्थानकांवर जनजागृृती केली.

गत मार्च महिन्यापासून कोविड-१९ कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लाकडाऊन सुरू होते. यामुळे सर्व रेल्वेगाड्याही बंद होत्या मात्र, प्रादुर्भाव कमी होताच तसेच अनलॉक होताच रेल्वे प्रशासनाने काही विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. सध्या २०० विशेष रेल्वेगाड्या रुळावर धावत असून टप्प्याने अनेक गाड्या सुरू करण्यात येत आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये ‘फेस्टीवल स्पेशल’ गाड्याही सुरू केल्या गेल्या.

यामुळे रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायचा घेत घातपाच्या घटना घडू शकतात. यासाठी बॉम्ब शोध नाशक पथकाने नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक, इतवारी व कामठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बॉम्ब तसेच बेवारस बॅग संदर्भात मार्गदर्शन करीत जनजागृृती केली. दरम्यान शेकडो प्रवाशांना बेवारस पडलेली बॅग आढळल्यास काय करावे, कुठे माहिती द्यावी याबाबत मार्गदर्शन करीत प्रवाशांना सतर्क व सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सदर जनजागृृती अभियान लोहमार्ग पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात झाले. सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख, पो.ह.वा. रवींद्र बांते, पो.शि. राहुल गवई, समीर खाडे, निरज पाटिल, नागेश चौरपगार, भावेश राणे, श्वान हस्तक पो.शि. राहुल सेलोटे, श्वान योद्धा वाहन चालक श्रीकांत उईके आदींनी जनजागृृती अभियान राबविले. हे जनजागृृती अभियान इतरही रेल्वे स्थानकांवर राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले.