Published On : Thu, Apr 9th, 2020

कोरोनाग्रस्तांसाठी बोधराज इटनकर यांची एक लाखाची मदत

गडचिरोली : जिल्ह्यातील व्यावसायिक बोधराज उर्फ राजेश इटनकर यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाख रुपयांची मदत केली. बुधवारी (ता. 8) त्यांनी एक लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना सुपूर्द केला. बोधराज इटनकर हे औषध क्षेत्रातील व्यावसायिक असून सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून लोकांचा बचाव करण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या कार्यात सहकार्य करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी आपला मानस निसर्ग अभ्यासक तथा पत्रकार मिलिंद उमरे यांच्याकडे व्यक्त केला.

मिलिंद उमरे यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोधराज इटनकर व त्यांचा पुत्र मृणाल इटनकर यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

यावेळी मिलिंद उमरे व किशोर खेवले यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी सिंगला यांनी इटनकर यांच्या दातृत्वाचे कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वप्रकारच्या मदतीची गरज असून समाजातील इतरही सुहृदयी, दानशूर नागरिकांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बोधराज इटनकर यांनी आपण केवळ एवढाच निधी देऊन शांत बसणार नसून या संकटाच्या काळी याहून अधिक व शक्य होईल तेवढी मदत करू असे सांगितले.