Published On : Thu, Jul 15th, 2021

नासुप्रच्या सर्व साधारण सभेत विविध कामांना विश्वस्त मंडळाची मंजुरी

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास येथे मंगळवार, दिनांक १३ जुलै रोजी संपन्न झालेल्या विश्वस्त मंडळाच्या ११९८व्या सर्व साधारण सभेत विविध कामांना मंजुरी देण्यात आली. नासुप्रचे सभापती मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नासुप्र विश्वस्त व जिल्हाधिकारी मा. श्रीमती विमला आर (भा.प्र.से.), नासुप्र विश्वस्त व महापालिका आयुक्त मा. श्री. राधाकृष्णन बी (भा.प्र.से.), नासुप्र विश्वस्त व पश्चिम नागपूरचे आमदार मा. श्री. विकास ठाकरे, नासुप्र विश्वस्त व स्थायी समिती सभापती मा. श्री. प्रकाश भोयर, नासुप्रचे विश्वस्त मा. श्री. संजय बंगाले, अधिक्षक अभियंता मा. श्रीमती लिना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी मा. श्री. ललित राऊत आणि नासुप्रचे महाव्यवस्थापक मा. श्री. निशिकांत सुके तसेच नासुप्र’चे इतर अधिकारी उपस्थित होते.

विश्वस्त मंडळाने मंजुर करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये प्रामुख्याने

१) सन २०११-२२ या वर्षातील भूभाटकाचे मागणीपत्र पटविण्याकरिता भूभाटकांना दिनांक १ जून २०२१ ऐवजी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

२) शासन निर्णय क्रमांक सेनिवे-२०१९ प्र.क्र. ३४८/सेवा-४ दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ नुसार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्त वेतनधारकांना निवृत्तवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारित लाभ देण्यास मान्यता दिली.

3) घर बांधणी अग्रिम- अग्रिमाच्या रकमेत तसेच घराच्या किमतीत मर्यादित सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०१ जानेवारी २०२१ चा शासन निर्णय प्रन्यास अधिकारी/कर्मचार कर्मचाऱ्यांना लागू केला

४) मौजा चिखली (देव) इतवारा किराणा मर्चंटला दिलेल्या जागेच्या बाजूला प्रन्यासच्या मालकीच्या जागेवर एक लोकोपयोगी प्रकल्प जनतेला उपलब्ध होणार असून नासुप्रद्वारे या जागेवर फूड मार्केट, वेअर हाऊसेस इत्यादी प्रकल्प राबविण्यात यावेत. तसेच अंबाझरी उद्यान विकासाचे काम शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे दिले आहे. मंडळाने हे काम खाजगी कंपनीकडे ३० वर्षासाठी दिले आहे. ही कंपनी ‘एमटीडीसी’ला दरवर्षी १.५ कोटी देणार आहे. नासुप्र आणि महसूल खताच्या एकूण ४४ एकर जमिनीवर हे उद्यान आहे. श्री. विकास ठाकरे यांनी आता उद्यान विकासाचे कामे प्रन्यासने केल्यास लोकांना सुविधा होईल. सबब त्यानुसार शासनास प्रस्ताव पाठवावा असा विषय मांडला व तो मान्य करण्यात आला.

५) कळमना पोलिस स्टेशनच्या इमारत बांधकामाकरिता मौजा पारडी, खसरा क्रमांक ३/३ (पार्ट), ३/२, आराजी १९३४.८०२ चौ.मी. ही जागा प्रचलित सिद्ध शिग्रगणकानुसार आजच्या बाजार भावाने पोलिस विभागाला वाटप करण्याचा प्रस्ताव शासनाला मान्यतेसाठी पाठविण्यात यावा असे ठरविले.

६) संपूर्ण गुंठेवारी अंतर्गत येणारी कामे करण्यास मान्यता दिली.

७) श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी प्रकल्पाच्या विकासाकरिता रु.२२ कोटी निधी नासुप्रकडून उपल्बध करून देण्यात आला.

८) मौजा भामटी खसरा क्रमांक ८७ येथील सार्वजनिक/निमसार्वजनिक उपयोगाच्या भूखंडाचे वाटप डिस्पेनसरी व मॅटरनिटी होम याचा उपयोगाकरिता करण्यासाठी जाहीर प्रसिद्धीद्वारे करण्यास मान्यता दिली.