
नवी दिल्ली:सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी प्रकाशित करण्यासाठी आणि फॉर्म 17C च्या प्रती त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्या लोकसभा निवडणुकीसाठी सहावा टप्प्यात मतदान पार पडणार असल्याचे सांगितले. निवडणुकीनंतर या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे,असेही न्यायालयाने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय पक्षांनी मतदानाच्या आकडेवारीत अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदानाची टक्केवारी ही एक गोष्ट आणि आठवडाभरानंतर दुसरी गोष्ट असल्याचा दावा राजकीय पक्ष करतात. याबाबत सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फॉर्म 17C ची स्कॅन कॉपी वेबसाइटवर अपलोड करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.








