Published On : Thu, Apr 5th, 2018

सलमान खान दोषी; सैफ, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रेची निर्दोष मुक्तता

Advertisement

जोधपूर: 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरूवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. तर या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, निलीमा आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालामुळे सलमान खानला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, न्यायालय आता सलमान खानला किती वर्षांची शिक्षा सुनावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायाधीशांनी सलमानला तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यास हे प्रकरण सत्र न्यायालयात जाईल. तसेच सलमानला तुरूंगातही जावे लागेल. परंतु तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्यास मॅजिस्ट्रेट न्याय᤾लयातच या प्रकरणाची सुनावणी होईल. त्यामुळे सलमान लगेचच जामिनासाठी अर्ज करून सुटू शकतो.

वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणात सलमान विरोधात पुरावे देखील आहेत, असे सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते. मात्र, अभियोजन पक्षाच्या कथनात अनेक त्रुटी असून या प्रकरणातील आरोप सिद्ध करण्यात त्यांना अपयश आले आहे, असा दावा सलमानच्या वकिलांनी कोर्टात केला होता. या प्रकरणात किमान १ वर्ष आणि जास्तीत जास्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.