
नागपूर– नागपूर शहरातील हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील खडका शेत शिवारात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १७९ गॅस सिलेंडर, रिफिलिंग साहित्य, वाहने व रोकड असा एकूण ११ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५ आरोपींविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम (EC Act) व BNS कलम २८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट क्र. १ ला मिळालेल्या विश्वसनीय गोपनीय माहितीनुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.१० वाजता हिंगणा येथील खडका गावातील आरोपी हबीब गुलाम शेख यांच्या शेतातील गोडाऊनवर दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.
या छाप्यात सुनिलकुमार हजमानाराम जानी (४२), प्रकाश बुधाराम खिल्लेरी (२३) व श्रवणकुमार राजुराम जानी (सर्व रा. राजस्थान, सध्या हिंगणा) हे आरोपी घरगुती गॅस सिलेंडरमधील ज्वलनशील गॅस मशीनच्या साहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना रंगेहाथ पकडण्यात आले. हे कृत्य स्वतःच्या तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे असून आर्थिक फायद्यासाठी काळाबाजाराच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले.
जप्त मुद्देमालात काय आढळले?
छाप्यात HP, इंडियन व भारत कंपनीचे घरगुती व व्यावसायिक वापराचे भरलेले व रिकामे असे एकूण १७९ गॅस सिलेंडर, रिफिलिंग मोटारी, वजनकाटे, रेग्युलेटर, पाईप्स, व्हॅक्यूम पंप, मोबाईल फोन, १२,७०० रुपयांची रोकड तसेच गॅस सिलेंडरच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पिकअप (RJ 18 GC 7609) असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
EC Act व BNS अंतर्गत गुन्हा-
सदर प्रकरणात आरोपींविरोधात पोलीस ठाणे हिंगणा येथे गुन्हा रजि. क्र. २६/२०२६, BNS कलम २८७ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई API राजाभाऊ जाधव (गुन्हे शाखा युनिट क्र. १, नागपूर शहर) यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.
सर्व आरोपी व जप्त मुद्देमाल ई-साक्ष नोंदवून पुढील तपासासाठी हिंगणा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.








