मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले. राष्ट्रीय पक्षांचे बोलायचे झाले तर भाजपने आघाडी घेत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवाराच्या नावाचा समावेश नाही. मात्र भाजप महाराष्ट्रातील जागावाटपाच्या संदर्भात माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात भाजप 30 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर उर्वरित 18 जागा या मित्र पक्षांना दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यापैकी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 10 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळू शकतात.
पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून अधिक जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपाचा अंतिम फार्म्युला काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक 6 मार्च रोजी होणार आहे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सात तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा सोडण्याची ऑफर भाजपने दिली आहे. महाराष्ट्रातील जागा वाटपावर महायुतीतील नेत्यांमध्ये अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.