नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी सज्जता दाखवत आपापल्या पातळीवर संघटनबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षानेही या निवडणुकांसाठी आपली रणनिती अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत.
या दौऱ्याअंतर्गत मुख्यमंत्री फडणवीस संपूर्ण २८८ विधानसभा मतदारसंघांना भेट देतील. तेथे सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला जाईल, तसेच स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थितीचीही समीक्षा करण्यात येणार आहे. या दौऱ्याद्वारे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा भाजपाचा उद्देश आहे. पक्षाने या दौऱ्यासाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाला विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या एक वर्षानंतर कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उर्जा भरण्याची गरज वाटत आहे. गेल्या निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते थोडे सुस्त झाले आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी हा दौरा आखण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीतील अपेक्षित निकाल न आल्याने भाजप संघटना काहीशी खचलेली होती. मात्र त्यानंतर पक्षाने पुन्हा ताकदीनं उभारी घेत आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपाची ओळख ‘चुनाव मशीन’ म्हणून असल्याचे समर्थक आणि विरोधकही मान्य करतात आणि हेच प्रतिमान कायम ठेवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा नेमका कधीपासून सुरू होईल, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र पक्षाने दौऱ्याचा संपूर्ण आराखडा तयार ठेवला असून, तो लवकरच कार्यान्वित केला जाण्याची शक्यता आहे.