नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपने नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या संख्येने भाजपने गेल्या तीन दशकांचा विक्रम मोडून काढला असून, राज्यभरात पक्षाने वर्चस्व सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांशी रामगिरी निवासस्थानी संवाद साधत विजयी प्रतिनिधींचं अभिनंदन केलं, तर विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
नागपूर जिल्ह्यात भाजपची दमदार कामगिरी-
नागपूर जिल्ह्यात भाजपने अपेक्षेपेक्षा अधिक चांगला निकाल दिला असून, २७ पैकी तब्बल २२ नगरपरिषदांमध्ये विजय मिळवला आहे. जिल्ह्यातून ३१७ नगरसेवक आणि २२ नगराध्यक्ष भाजपचे निवडून आल्याने पक्षाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम प्रतिक्रिया-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपूर जिल्ह्यातील हा निकाल कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाचा कौल आहे. या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे की महाराष्ट्रात भाजप हा आघाडीचा आणि विश्वासार्ह पक्ष आहे.ते पुढे म्हणाले,
राज्यभर पाहिल्यास भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. एकूण नगराध्यक्षांपैकी जवळपास ६५ टक्के नगराध्यक्ष भाजपचे आहेत. २०१७ मध्ये सुमारे १५०० नगरसेवक निवडून आले होते, मात्र यावेळी ३००० हून अधिक नगरसेवक भाजपचे विजयी झाले आहेत. गेल्या ३० वर्षांत कोणत्याही पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं नाही. राज्यातील एकूण नगरसेवकांपैकी सुमारे ४८ टक्के प्रतिनिधी भाजपचे असणं, हा जनतेने दिलेल्या ठाम कौलाचा पुरावा आहे.
विरोधकांचे बालेकिल्ले ढासळले-
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विरोधकांचे पारंपरिक बालेकिल्ले कोसळले आहेत. काही नगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत असूनही नगराध्यक्ष निवडून येऊ शकले नाहीत, तरीही भाजपचा विजयाचा प्रवास थांबणार नाही. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांत भाजप अधिक जोमाने मैदानात उतरेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.ही कामगिरी म्हणजे केवळ आकड्यांचा विजय नसून, महाराष्ट्रातील राजकीय दिशाच बदलणारा निर्णायक टप्पा असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर रामटेक नगरपालिका काँग्रेस मुक्त केल्या, तर कामठी शहरात नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच कमळ फुललं, असे अनेक विक्रम या निवडणुकांनी केले असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.









