
नागपूर : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात महायुतीबाबतची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. दोन महिन्यांमध्ये राज्यभरातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांच्या तीव्र इच्छेला प्रतिसाद देत भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
बावनकुळे म्हणाले, “राज्यातील विविध भागांतील आमचे कार्यकर्ते महायुतीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी करत होते. त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिले आहेत.” त्यामुळे नागपूर जिल्ह्यासह काही भागांत महायुतीच्या ऐवजी भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
यापूर्वी भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका युतीतून लढवल्या असल्याने स्थानिक निवडणुकाही तशाच पद्धतीने होणार असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “जिथे युतीचा फायदा होईल तिथेच निर्णय घेऊ, अन्यथा स्वबळावर लढू,” असे म्हटल्याने संभ्रम निर्माण झाला होता.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपने महायुती किंवा जागावाटपाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा सुरू केलेली नाही. त्याचवेळी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आता भाजप स्वतंत्रपणे तयारीला लागली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने सुद्धा काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे, काँग्रेसही स्वतःच्या बळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
सर्व पक्षांनी स्वबळावर जाण्याची भूमिका घेतल्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात त्रिकोणी किंवा चतुर्कोणी लढतींचे मैदान बनण्याची चिन्हे आहेत.










