Published On : Fri, Aug 14th, 2020

भाजपातर्फे हिवरी नगर सबस्टेशनपुढे भीख मांगो आंदोलन

Advertisement

लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिल विरोधात एल्गार

नागपूर, : कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासनातर्फे पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिल विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे शुक्रवारी (ता.१४) शहरात सर्वत्र भीख मांगो आंदोलन करण्यात आले आहे. पूर्व नागपूरमध्ये नेहरूनगर झोन अंतर्गत हिवरी नगर सबस्टेशनपुढे भाजपा प्रदेश सचिव तथा विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, नेहरू नगर झोन सभापती समिता चकोले, देवेंद्र काटोलकर, वार्ड अध्यक्ष सुरेश बारई, राजेश संगेवार, अशोक देशमुख, प्रवीण बोबडे, प्रशांत मानापूरे, विनोद बांगडे, विनोद कुटे, सुधीर दुबे, राजू गोतमारे, मधुकर बारई, अनंत शास्त्रकार, नंदाताई येवले, चुन्नीलाल लांजेवार, किशोर सायगन, विक्रम ढुंबरे, बालू तुपकर, मोसमी वासनिक, तुळशीदास ठवरे, राम सामंत यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकच नागरिकाने आपापल्या परीने सहकार्य केले. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे हाल झाले. मात्र या काळात शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करीत नागरिकांनी ते हालही सहन केले. लॉकडाऊनच्याकाळात नोकऱ्या नाहीत, व्यवसाय ठप्प, हातात रोजच्या गरजांसाठी पैसा नाही, अशा स्थितीत अनेकांनी विफल होऊन आत्महत्येचेही पाऊल उचलले. लाॅकडाऊनमध्ये सुमारे तीन महिने वीज बिल न पाठविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला. या निर्णयाने नागरिकांना तीन महिने काहीसा दिलासा मिळाला.

मात्र ‘अनलॉक’ सुरू होताच राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाद्वारे अव्वाच्या सव्वा बेताल वीज बिल पाठवून सर्वांच्याच जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. राज्य शासनाच्या या अमानुष धोरणाचा भारतीय जनता पार्टी तर्फे वेळोवेळी विरोध करण्यात आला. ऊर्जा मंत्र्यांच्या घरावरही भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणेच ऊर्जा मंत्र्यांनी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या वीज बिलाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. राज्य शासनाच्या या निष्ठूर धोरणाचा निषेध म्हणून भाजपातर्फे भीख मांगो आंदोलन करून जनतेच्या प्रश्नांसाठी एल्गार पुकारला आहे, असे प्रतिपादन यावेळी भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.