
नागपूर: जगात येणारे नवीन तंत्ऱज्ञान, माहिती, संशोधन, यशस्वी अनुभव, संशोधन हेच आमच्या देशाचे भविष्य असून 21 व्या शतकात हे सर्व तंत्रज्ञान जमिनीवर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भाजपातर्फे मध्यप्रदेश येथे आयोजित जनसंवाद रॅलीला ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, थावरचंद गहलोत, नरेंद्र तोमर, फग्गनसिंग कुलस्ते, कैलास विजयवर्गीय, प्रभात झा, आदी ऑनलाईन उपस्थित होते. आज आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत, पण पूर्वी जनसंघाचे कार्यकर्ते होतो. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय, अटलजी, अडवाणीजी या सर्वांनी आमच्या विचारांना राष्ट्रनिर्माणाचा दृष्टिकोन दिला. हजारो कार्यकर्त्यांनी आपले जीवन या विचारांसाठी समर्पित केले. आज सत्ता दिसत आहे म्हणून नव्हे तर सत्ता कोसो दूर होती तेव्हाही हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. अशा संघर्षशील स्थितीतही त्यांनी आपली विचारधारा सोडली नाही. ती विचारधाराच आमची प्रेरणा होती, असेही गडकरी म्हणाले.
मातृभूमीला सुखी, संपन्न आणि शक्तिशाली बनविणे, देशातील गाव, गरीब, मजूर, शेतकरी यांचे कल्याण करण्यासाठी पं. दीनदयाल उपाध्याय यांनी सामाजिक आणि आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपात आम्हाला दिले. ते चिंतनच आमची प्रेरणा आहे. दरिद्री नारायणाला देव मानून त्यांची सेवा करू. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळेल तेव्हाच आमचे उद्दिष्ट पूर्ण होईल, हाच आमचा जीवननिर्धार आहे, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर या देशाची काय स्थिती होती, याचा विचार केला तर लक्षात येईल की, देशाला स्वातंत्र्य तर मिळाले होते, पण देशात सुशासन कसे येईल, आधुनिक देश कसा होईल, हा देश महासत्ता कसा होईल ही चिंता होती. काँग्रेसला संधी मिळाली. 70 वर्षात काँग्रेसने 55 वर्षे देशावर राज्य केले. गरीबी हटावसारखे नारे व अनेक घोषणा दिल्या. पण त्याचा फायदा झाला नाही. यानंतर प्रथमच देशात अटलजींचे सरकार आले आणि या देशाला प्रथम विकासाची दिशा त्यांनी दिली. सुखी, समृध्द, संपन्न व शक्तिशाली देश बनविण्याची नीती आखली गेली, असेही गडकरी म्हणाले.
अटलजींनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाची एकाहाती सत्ता या देशात आली. कार्यकर्त्यांची तपस्या आणि बलिदानाचा हा परिणाम होता. आणि काँग्रेसच्या 55 वर्षाच्या काळात जे काम झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 5 वर्षात झाले, ही आमची उपलब्धी आहे. पं. दीनदयालजींच्या चिंतनातून गरीबांच्या कल्याणाचा मार्ग, ग्रामीण भागाचा विकास, तरुणांना गावातच रोजागार, तंत्रज्ञानाचा सर्वांसाठी उपयोग करून हा देश जगातील महासत्ता बनावी हाच विचार करून आम्ही काम केले. आधुनिक विचारधारा स्वीकारली. लोकांना जे आम्ही म्हटले ते करून दाखवले.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला विकास आणि प्रगतीकडे न्यायचे आहे. सुखी, समृध्द, संपन्न व शक्तिशाली बनवायचे आहे. 21 व्या शतकातील हिंदुस्थान सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवू असा संकल्प आपण सर्व जण करून देशाला आत्मनिर्भर भारत बनवू असेही गडकरी म्हणाले.











