Published On : Fri, May 18th, 2018

भाजपला बळ राणेंचे

Advertisement

Narayan-Rane

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यामुळे महाराष्ट्रातल्या पालघर आणि भंडारा-गोदिंया या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली आहे. पालघरमध्ये शिवसेनेशी लढत असल्याने भाजपने प्रचाराच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उतरविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रचारात राणे विरुद्ध शिवसेना अशी टक्कर बघायला मिळेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांवरही जबाबदारी सोपविली आहे. दोन्ही लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे.

चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. परंतु शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिल्याने पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेसाठीही ही निवडणूक महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पालघरमध्ये बघायला मिळेल. पालघरमध्ये भाजप, शिवसेनेसह काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत पंचरंगी होईल.

देशातील २१हून अधिक राज्यांत भाजपने सत्ता काबीज केली असली तरी देशात काही ठिकाणी पोटनिवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. परंतु महाराष्ट्रातील पोटनिवडणुका अपवाद ठराव्यात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेहनत घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पालघरची जबाबदारी पक्षाच्या मंत्र्यांवर सोपवली आहे. त्यानुसार पालकमंत्री विष्णू सवरा हे पालघरमध्ये तळ ठोकून आहेत. याशिवाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे प्रत्येक टप्प्यातील निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवून आहेत. पालघरमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सभा होणार आहेत. तसेच एनडीएतील नेते रामदास आठवले, नारायण राणे हे पालघरमध्ये भाजपचा प्रचार करणार आहेत.

पालघरच्या तुलनेत भंडारा-गोंदियाची पोटनिवडणूक भाजपसाठी सोपी आहे. येथे भाजपची मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे. भंडारा-गोंदियाची लढत अवघड नसली तरी भाजपने पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.