
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमधील भाजपचा विजय हा विकास आणि महायुतीवरील जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. हा कौल म्हणजे केवळ निवडणुकीचा निकाल नसून, तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेतृत्वावर व्यक्त झालेला ठाम विश्वास आहे, असे ते म्हणाले.
मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असून, सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती मोठ्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या कलांमुळे तब्बल २५ वर्षांनंतर मुंबईवरील ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे कल कायम राहिले तर मुंबई महापालिकेची सत्ता महायुतीकडे जाईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, हा विकासाचा कौल आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच महाराष्ट्राचा वेगाने विकास करू शकते, अशी जनतेची भावना आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना महायुती दोन-तृतीयांश बहुमतासह आणि सुमारे ५१ टक्के मतवाट्याने मुंबई महापालिकेची सत्ता मिळवेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
नागपूर महापालिकेतही जनतेने विकासालाच प्राधान्य दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत नागपूरकरांनी ‘विकसित नागपूर’ला मत दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विकासालाच कौल मिळत असल्याचे प्राथमिक चित्र असून, सायंकाळनंतर संपूर्ण निकाल स्पष्ट झाल्यावर अधिक भाष्य करता येईल, असे ते म्हणाले.
राज्यात भाजप-महायुतीला भक्कम बहुमताचा विश्वास-
महाराष्ट्रातील एकूण नगरसेवकांपैकी सुमारे ५१ टक्के नगरसेवक भाजप व महायुतीचे असतील आणि भाजपला दोन-तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत मिळेल, असा आत्मविश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासासाठी ठोस व्हिजन मांडले असून, एकनाथ शिंदे यांच्यासह विकसित मुंबईसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मुंबईला मोठे पाठबळ मिळाले, त्यामुळेच विकासासाठी भाजप-महायुतीवरच जनतेचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
‘भाजपची गाडी १०० च्या वेगाने’-
या निवडणुकांची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि स्वतः बावनकुळे यांनी समन्वयाने आखली, असे सांगत त्यांनी सरकारच्या विकास योजना आणि संघटनेची ताकद ही दोन चाके एकत्र फिरल्यामुळे भाजपची गाडी शंभरच्या वेगाने पुढे गेल्याचे नमूद केले. मात्र, लातूरमध्ये काहीसे नुकसान झाले असून तेथे काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्या निकालाचा सखोल आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर-
ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठाकरे बंधूंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, ज्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा विजय झाला तेथे ईव्हीएम योग्य ठरतात आणि जिथे भाजप जिंकतो तेथेच मशीनवर संशय घेतला जातो, हे जनतेला पटणारे नाही. जनतेला विकास महत्त्वाचा वाटतो. यापुढे महाराष्ट्रात केवळ विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.








