Published On : Wed, Oct 27th, 2021

रमाई घरकूल योजना आणि पट्टे वाटपाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही : आमदार प्रवीण दटके

Advertisement

रमाई घरकूलच्या पात्र लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपाचा भव्य मोर्चा

नागपूर, : नागपूर शहरातील गोरगरीब जनतेला त्यांचे हक्काचे घर मिळावे, त्यांना त्यांचे मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळत विशेष लक्ष देउन सर्व प्रश्न मार्गी लावले. मात्र राज्यात सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारने मागील दोन वर्षात मालकी हक्क पट्ट्यांच्या विषयाकडे पूर्णत: दुर्लक्ष केलेच पण रमाई आवास घरकूल योजनेचा एक छदामही दिला नाही. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत हे सुद्घा कुंभकर्णी निद्रेतच आहेत. स्वत:चे कार्यालय, बंगला, गाडी याच्यातच मदमस्त असलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करून नागपूर शहरातील जनतेला त्यांच्या हक्काचे रमाई घरकूल योजनेचा निधी आणि मालकी हक्काचे पट्टे मिळवून दिल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि एकेक कार्यकर्ता हा स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही भाजपाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी दिली.

रमाई घरकूल योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व महाविकास आघाडीला जागविण्यासाठी बुधवारी (ता. २७) भारतीय जनता पार्टीच्या झोपडपट्टी आघाडी, महिला आघाडी आणि अनुसूचित जाती मोर्चातर्फे संयुक्तरित्या शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.संजय भेंडे, मोर्चाचे संयोजक प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संविधान चौकामध्ये उपस्थित योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.

मोर्चानंतर जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. नागपूर येथील रमाई आवास योजनेचे रखडलेले ४० कोटी रुपयांचे अनुदान त्वरीत मिळणे व झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार गिरीश व्यास, अनुसूचित जाती आघाडीचे महामंत्री माजी आमदार डॉ. मिलींद माने, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी महापौर संदीप जोशी, महिला आघाडी अध्यक्ष नीता ठाकरे, अश्विनी जिचकार, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राजेश हाथीबेड, झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष परशू ठाकुर, नगरसेवक संदीप जाधव, नरेंद्र (बाल्या) बोरकर, संजय बंगाले, नागेश सहारे, शहर मंत्री ॲड.राहुल झांबरे, कीर्तिदा अजमेरा, सतीश सिरसवान, दक्षिण-पश्चिमचे अध्यक्ष किशोर वानखेडे, पूर्व नागपूर अध्यक्ष संजय अवचट, दक्षिणचे अध्यक्ष देवेन दस्तुरे, दिलीप गौर, बंडू सिरसाठ, अश्वनी जिचकार, रामभाऊ आंबूलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना नागपूर शहराला निधीची कमी पडली नाही. आपल्या शहरातील गोरगरीब जनतेला त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी रमाई आवास योजना व मालकी हक्काच्या पट्ट्यांसाठी सर्व विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आपल्या क्षेत्रातील लोकांना रमाई आवास घरकूल योजनेचा लाभ मिळवून दिला. अनेकांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहेत. नागरिकांचे हाल होत असताना सरकारमधील ऊर्जामंत्री असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत हे मूग गिळून गप्प बसले आहेत. तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी रखडलेला असलेल्या त्याचा फटका शहरातील गोरगरीब जनतेला बसत आहे. या सरकारच्या अशा धोरणाचा निषेध म्हणून हा संघर्ष सुरू असून तो न्याय मिळेपर्यंत सुरूच राहिल, असेही शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके म्हणाले.

नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शहरातील गोरगरीब जनतेसाठी एकमेव आसरा असलेली रमाई आवास घरकूल योजनेच्या संदर्भात ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला असल्याचेही सांगितले. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असमताना शहरातील प्रत्येकच व्यक्तीच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जात होता. मात्र आज तसे होत नसल्याची खंत आहे. रमाई आवास योजनेचे लाभार्थी हे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतिनिधीत्व करीत असलेल्या समाजाचे आहेत. समाजातील व्यक्ती नेतृत्व स्वीकारतो तेव्हा त्याच्याकडून आपसूकच समाजबांधवांच्या अपेक्षा वाढतात. नेतृत्व करणा-या व्यक्तीने स्वत:चाच विचार करीत समाजाकडे दुर्लक्ष केल्याचे हे परिणाम आहेत. रमाई आवास योजनेचा निधी थांबविल्यानंतरही त्यावर एक शब्द न बोलणा-या पालकमंत्री नितीन राऊत हेच सर्वस्वी लाभार्थ्यांच्या आजच्या स्थितीला जबाबदार असल्याचा घणाघातही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला.

मोर्चाचे संयोजक भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडी आणि पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर प्रखर तोफ डागली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी रमाई आवास घरकूल योजनेसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला. सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकाने यातील ४० कोटी रुपये निधी थांबविला. या निधीअभावी आज दलित समुदाय त्यांच्या हक्काच्या छप्परापासून वंचित होत आहे. एकीकडे समाजाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री नितीन राऊत निळी टोपी घालून बाबासाहेबांचे नाव घेतात. मात्र त्याच सरकारद्वारे बाबासाहेबांच्या समाजाला माता रमाईच्या नावाने सुरू असलेल्या योजनेपासून वंचित ठेवण्याचा घाट रचला जात आहे. फुले, शाहु, आंबेडकरांचे नाव ओठावर ठेवून त्याच समाजाच्या पाठीत खंजिर खुपसण्याचे कारस्थान राज्यातील महाविकास आघीडी सरकारद्वारे केले जात आहे. बाबासाहेबांचे नाव घेउन दलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून सत्ता प्राप्त करून दलितांच्या प्रश्नांकडेच जर दुर्लक्ष करीत असाल तर राज्याचे मंत्री आणि समाजाचे प्रतिनिधी म्हणून सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नसल्याचा घणाघात ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी नितीन राऊत यांच्यावर केला.

मोर्चादरम्यान झालेल्या सभेचे संचालन सतीश सिरसवान यांनी केले.