नागपूर -राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी आज सुरू होताच पुन्हा एकदा भाजपची जोरदार मुसंडी पाहायला मिळत आहे. गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर जसे-जसे निकाल हाती येत आहेत, तसे भाजपचे वर्चस्व अधिकच ठळक होत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांतही भाजपला मोठे यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला असून, मुंबईत ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती पिछाडीवर आहे. भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती अनेक ठिकाणी आघाडीवर असल्याचे चित्र आहे.तसेच नागपुरातही भाजपने शंभरी पार केली आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील २९ महापालिकांपैकी तब्बल २६ महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, सांगली, कल्याण-डोंबिवलीसह अनेक महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे.
एकूण जागांबाबत बोलायचे झाल्यास, आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपचे ७४१ उमेदवार आघाडीवर असून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट) १९० जागांवर आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर काँग्रेसचे १५४ उमेदवार आघाडीवर आहेत.
मुंबई महानगरपालिकेत भाजप ६६ जागांवर आघाडीवर आहे. नवी मुंबईतही भाजप ६६ जागांवर पुढे आहे. ठाण्यात मात्र शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर असून त्यांचे २० उमेदवार पुढे आहेत, तर भाजपचे १५ उमेदवार आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये भाजप १० जागांवर आघाडीवर आहे.
पुण्यात भाजप पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असून तब्बल ४८ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत ७० जागांवर आघाडी घेतली आहे. पनवेलमध्ये भाजप २२ जागांवर पुढे आहे, तर कल्याण-डोंबिवलीत १७ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मिरा-भाईंदरमध्ये भाजप ३२ जागांवर आघाडीवर असून उल्हासनगरमध्ये १४ जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत. भिवंडी-निजामपूरमध्येही भाजप आघाडीवर असून ९ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
एकूणच राज्यातील महापालिका निवडणुकांत भाजपने मोठी झेप घेतल्याचे चित्र स्पष्ट होत असून, अंतिम निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








