Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, May 29th, 2018

  भाजपा – सेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत असायला हवी – नितीन गडकरी

  मुंबई : केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा – शिवसेनेची युती आहे आणि ही युती कायम असली पाहिजे. मात्र कधी कधी “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना” अशी परिस्थिती निर्माण होते. असं म्हणत केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी परत एकदा शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

  यावेळी नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करत देवेंद्रला लहानपणापासून ओळखतो, ते फार सुसंस्कृत आहेत, देवेंद्र फडणवीस हे नियमबाह्य बोलणाऱ्यांपैकी नाहीत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी जी उक्ती वापरली, त्या साम-दाम-दंड-भेदचा अर्थ पूर्ण ताकदीने लढा, असा होतो. त्यात गैर काहीच नाही, असं म्हणून नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. इंधन दरवाढीवर बोलताना गडकरी म्हणाले की, इंधन दरवाढ हा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आहे. जर आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले तर देशातही इंधनाचे दर कमी होतील. मात्र याची वाट न पाहता यातील दुसरा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे गडकरी म्हणाले. तसंच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला येण्यावरुन निर्माण झालेल्या वादावर बोलताना, संघाच्या कार्यक्रमाला मुखर्जी येण्यात गैर काय असा प्रश्न विचारला. प्रणब मुखर्जी कार्यक्रमाला आले तर स्वागतच असं त्यांनी म्ह्टले.

  यावेळी पत्रकारांनी त्यांना सोशल मीडियावर काही प्रकरणांमध्ये तुमच्या कुटुबियांची नावे घेतली जातात असं विचारलं असता, सोशल मीडियात कोणीही काहीही टाकतं. माझ्या कुटुंबाचा कशाशी काही संबंध नाही. असेल तर छापून टाका असं म्हणत त्यांनी वेळ मारून घेतली.

  पालघर निवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले, याबाबतही गडरींनी मत व्यक्त केलं. “निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. मशीन बंद पडणे ही बाब निवडणूक आयोगाने गंभीर्याने घ्यायला हवी. मात्र पंजाबमध्ये काँग्रेस जिंकल्यावर ईव्हीएम योग्य, उत्तर प्रदेशात हरल्यावर त्यात गडबड कशी?” असा सवालही गडकरींनी यावेळी उपस्थित केला. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काही गडबड वाटत असेल, तर त्याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं. अशी मागणीही त्यांनी केली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145