Published On : Mon, Oct 29th, 2018

भाजप-शिवसेना सरकारकडून मराठवाड्यावर जाणिवपूर्वक अन्याय! : खा. अशोक चव्हाण

Advertisement

परभणी : मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवून सरकार मराठवाड्य़ावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळतोय तरीही सरकार मराठवाड्याचे हक्काचे पाणी का देत नाही? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज परभणी जिल्ह्यात पोहचली. परभणी शहरात भव्य जनसंघर्ष सभा पार पडली. त्यानंतर पाथरी येथे भव्य जनसंघर्ष सभा झाली. यावेळी व्यासपीठावर खा. राजीव सातव, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, आ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री व परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ. सुरेश देशमुख, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हरिभाऊ शेळके, रामकिशन ओझा, प्रकाश सोनावणे, शाह आलम शेख, समशेर वरपुडकर, रविराज देशमुख, भगवान वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागती आहे. जनावरांना चारा नाही. पाण्याअभावी पिके व फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. सरकारला मात्र या दुष्काळाचे काही गांभीर्य नाही. दुष्काळी उपापयोजना अद्याप सुरु केल्या नाहीत. पालकमंत्री गायब आहेत. काही पालकमंत्री मोबाईल टॉर्चच्या उजेडात दुष्काळ पाहणी करित आहेत. तर काही पालकमंत्री त्यांचा स्वतःचा जिल्हा दुष्काळात होरपळत असताना अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. ही दुष्काळग्रस्त जनतेची क्रूर थट्टा आहे. दुष्काळ सदृश्य आणि पालकमंत्री अदृश्य अशी परिस्थिती आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पण सरकार जाणिवपूर्वक मराठवाड्याला पाणी देत नाही. अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे. जलयुक्त शिवार योजनेवर सरकारने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. या योजनेमुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा सरकारने केला होता पण प्रत्यक्षात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेत पाणी नाही तर पैसे मुरले आहेत. जलयुक्त शिवार झोलयुक्त शिवार झाले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. कर्जमाफीची फक्त घोषणा केली पण प्रत्यक्षात शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतक-यांकडून पीक विमा भरून घेतला पण शेतक-यांना पीक विमा मिळाला नाही. बोँडअळी, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. हे सरकार नाकर्ते आहे. शेतकरी कष्टक-यांना काही मदत करत नाही, त्यामुळे या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जनसंघर्ष सुरु केला आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

यावेळी बोलताना खा. राजीव सातव म्हणाले की, मोदी सरकारने अंबानी अदानींसह २२ उद्योगपतीचे सव्वा दोन लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण शेतक-यांना कर्जमाफी दिली नाही. मेहुल चोकसी, निरव मोदी, विजय मल्ल्या यांना मदत करून बँकांवर दरोडे घालण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून दोन वर्ष उलटले. पण अद्याप काम सुरु झाले नाही. मोदी पाकिस्तानला धडा शिकवणार होते. पण नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले. मोदींनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. जनता त्यांना धडा शिकवेल असे खा. सातव म्हणाले.

माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार , सुरेश वरपूडकर आ. वजाहत मिर्झा यांनी या सभेला मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.

काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा उद्या मंगळवारी जालना व औरंगाबाद जिल्ह्यात जाणार आहे. जालना, फुलंब्री व सिल्लोड येथे जाहीर सभा होणार आहेत.