Published On : Fri, Dec 8th, 2017

भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा

Advertisement

नागपूर: भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे.

नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती.

शेतकरी प्रश्नावरुन त्यांनी अनेकवेळा सरकारविरोधी भूमिका घेतली होती. नुकतंच भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनासाठी नाना पटोलेच यांनी सिन्हांना हाक दिली होती.

राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असूनही नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

नाना पटोले यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज न ेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.

पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.

‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत नाना पटोले यांनी वेळोवेळी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.