Published On : Mon, Apr 3rd, 2017

भाजप आमदाराच्या मुलीवर हल्ला, बोटं तुटली!

यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे भाजप आमदार संजीवशेट्टी बोदकुरवार यांची मुलगी अश्विनी हिच्यावर पिंपरीत प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्यात तिची बोटं कापली गेली आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी राजेश बक्षीला ताब्यात घेतलं आहे.

अश्विनी बोदकुरवार आणि राजेश बक्षी हे पुण्यातील बालाजी इन्स्टिट्युट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये एकाच वर्गात शिकत असल्याचं कळतं. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी अश्विनी हॉस्टेलमधून बाहेर पडत असताना, राजेशनं गेटजवळच धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. त्यातून ती बचावली, पण या हल्ल्यात तिची हाताची बोटं कापली गेली. सुदैवानं, ती शरीरापासून वेगळी झालेली नाहीत. वाकड येथील लाइफ पॉइंट हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. अश्विनीची प्रकृती स्थिर असल्याचं संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितलं.

या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी राजेश बक्षीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. त्यातून हल्ल्यामागचं कारण स्पष्ट होऊ शकेल.