Published On : Sat, Dec 9th, 2017

स्वतंत्र विदर्भासाठी आशिष देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; कारभारावर सरकारला घरचा आहेर

BJP-MLA-Ashish-Deshmukh
नागपूर: काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचे पत्र लिहिले आहे, ज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी ही रास्त असल्याचे म्हटले आहे.

फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा – सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राइम कॅपिटल बनले आहे, असे आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आशिष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नागपूर मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पामुळे जनतेचा फायदाच होणार आहे. या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत. मात्र या कामासाठी लागणारा पैसा लहान उद्योगांना सबसिडी म्हणून दिला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती, असे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची मागणी
मेट्रो रेल्वे प्रकल्प रोखून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशीही मागणी आशिष देशमुख यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्य सरकार केवळ शहरी विकासाकडे लक्ष देत आहे. ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत आशिष देशमुख यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

पत्र खलील प्रमाणे