नागपूर : तिरंगा रॅलीदरम्यान हेल्मेट न घालता दुचाकीवर स्टंट करणं भाजप आमदार आशीष देशमुख यांना महागात पडलं आहे. वाहतूक विभागाने नियमभंग केल्याबद्दल देशमुख यांच्यावर २,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
केंद्र सरकार आणि भाजप देशभरात तिरंगा यात्रा आयोजित करत आहेत. त्याचाच भाग म्हणून आशीष देशमुख यांनी त्यांच्या सावनेर विधानसभा क्षेत्रात रॅली काढली होती. या रॅलीत ते हेल्मेट न घालता दुचाकीवर उभे राहून वाहन चालवताना दिसले.
देशमुख यांचा हा प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून झपाट्याने व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत देशमुख यांच्यावर नियमभंग आणि हेल्मेटशिवाय वाहन चालवल्याबद्दल २,५०० रुपयांचा चालान पाठवला आहे. पोलिसांनी त्यांना पुढील काळात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची चेतावणी देखील दिली आहे.