Published On : Fri, Jun 26th, 2020

महिलांना रोजगारासाठी दिशा देण्याचे कार्य भाजपा महिला मोर्चाने करावे : नितीन गडकरी

महिला मोर्चाशी ई संवाद

नागपूर: विविध प्रकारचा हुनर असलेल्या समाजातील महिलांना रोजगार कसा मिळेल, त्या महिला स्वत:च्या पायावर कशा उभ्या राहू शकतील, यासाठी त्या महिलांना दिशा देण्याचे कार्य भाजपा महिला मोर्चाने करावे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाशी गडकरी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. जोपर्यंत यावर प्रतिबंधक लस निर्माण होत नाही, तोपर्यंत योग्य नियम पाळून कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- आत्मनिर्भर भारत म्हणजे प्रत्येकाने आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्याची ही संकल्पना आहे. आज महिला अनेक क्षेत्रात पुढे आहेत.

विविध प्रकारची कामे त्या करू शकतात. विविध कलागुण महिलांमध्ये आहेत. ती कला विकसित करून त्याचा उपयोग रोजगार आणि स्वावलंबी होण्यासाठी कसा होईल, हे काम महिला आघाडीला करायचे आहे. हे मोठे काम आहेत, असेही ते म्हणाले.

महिलांनी कोणता उद्योग करावा, त्यांच्या अंगात कोणते कलागुण आहेत, त्याप्रमाणे कोणता उद्योग त्यांनी करावा, याची माहिती करून घ्यावी. एमएसएमईतर्फे मी या कामात मदत करायला तयार आहे. विविध योजनांची माहिती महिला आघाडीने घ्यावी व त्याप्रमाणे इच्छुक महिलांना त्यांनी मार्गदर्शन करून दिशा द्यावी. विविध वस्तू बनविण्याचा उद्योगही महिला करतात. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा दर्जा उत्तम असावा. दर्जामध्ये कोणताही समझोता केला जाऊ नये. तरच या वस्तू बाजारात टिकाव धरतील व आपल्याला बाजाराचा फायदा होईल. हा आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. आर्थिकदृष्टीने सक्षम होण्याचा मार्ग असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले.