Published On : Tue, Mar 27th, 2018

भाजपाचा उतावळेपणा! निवडणूक आयोगाआधीच जाहीर केली निवडणुकीची तारीख

Advertisement

नवी दिल्ली: मोदी सरकारमुळे देशातील स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याची हाकाटी विरोधकांकडून पिटली जात असतानाच भाजपा आपल्या अतिउत्साहामुळे तोंडघशी पडली आहे. निवडणूक आयोगाकडून मंगळवारी कर्नाटक विधानसभेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मात्र, थक्क करणारी बाब म्हणजे भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निवडणूक आयोगाच्या आधीच सोशल मीडियावर परस्पर मतदान आणि निकालाच्या तारखा जाहीर केल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कर्नाटक विधानसभेसाठी मतदान 12 तारखेला होईल आणि मतमोजणी 18 तारखेला पार पडेल, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांची पत्रकार परिषद साधारण 11 च्या सुमारास सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मालवीय यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा ट्विट केल्या. परंतु, ओमप्रकाश रावत यांनी पत्रकार परिषदेच्या अगदी शेवटी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांपूर्वी अमित मालवीय निवडणुकांच्या तारखा कशा काय जाहीर करू शकतात, असा प्रश्न अनेकांना पडला. विशेष म्हणजे अमित मालवीय यांचे 12 मे रोजी निवडणूक होणार, हे भाकीत खरे ठरले. मात्र, त्यांच्या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे मतमोजणी ही 18 तारखेला होणार नसून 15 तारखेलाचा होईल, असे ओमप्रकाश रावत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. मालवीय यांच्या ट्विटबद्दल रावत यांना विचारण्यात आले असता रावत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मालवीय यांचे ट्वीटही लगेच व्हायरल झाले. मात्र त्यांच्या अकाऊंटवर पाहिले असता हे ट्वीट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. विधानसभेच्या 224 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. सिद्धरमैय्या मुख्यमंत्री आहेत. भाजप याठिकाणी भ्रष्टाचार आणि लिंगायत समाजाला धर्माची दर्जा देण्याचा मुद्दा उचलू शकते. गेल्या दोन महिन्यांत राहुल गांधी यांनी चार वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. तर भाजपाध्यक्ष अमित शाहदेखिल गेल्या महिनाभरात दोन वेळा कर्नाटकला गेले आहेत. सोमवारी दुसऱ्यांदा ते कर्नाटकात पोहोचले. एका दिवसांत सात कार्यक्रमांत त्यांनी उपस्थिती लावली. ते लिंगायत आणि दलित समुदायाशी संबंधित मठांचा दौरा करत आहेत.