Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Mar 23rd, 2018

  भाजप सरकार घोषणाबाजीत ‘हिरो’ कामात ‘झिरो’: खा. अशोक चव्हाण

  यवतमाळ: केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार घोषणाबाजीत हिरो असून कामात झिरो आहे. सरकारने घोषणा केलेल्या एकाही योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. या जनविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले ते यवतमाळ येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबीराला मार्गदर्शन करताना बोलत होते.

  केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत. ज्याप्रमाणात महागाई वाढते आहे त्याप्रमाणात शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही. आज पुन्हा एका शेतक-याने मंत्रालयाच्या गेटवर आत्महत्येचा प्रयत्न केला. राज्यात 13 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली. जालन्यामध्ये एका शेतक-याने पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेले पीक स्वतःच्या हाताने नष्ठ केले. केंद्रातले आणि राज्यातले सरकार शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. काँग्रेस पक्षाच्या दिल्ली येथील महाअधिवेशनात शेतक-यांसाठी कृषी विषयक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कृषी धोरणात अमुलाग्र करून शेतक-यांचा मालाला योग्य हमीभाव. गरजू शेतक-यांना २००९ प्रमाणे कर्जमाफी, शेतक-यांच्या मुलांना उत्तम शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा आणि शेतकरी व शेतमजुरांसाठी पेन्शन योजना. उत्पादन खर्चावर आधारित हमीभावासाठी कायदा, शेतक-यांच्या फायद्याची नविन पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीवेळी शेतक-यांना मिळणा-या मदतीत वाढ अशा विविध कल्याणकारी योजना काँग्रेस सरकार आल्यावर सुरु केल्या जातील असा प्रस्ताव मंजूर केला आहे या प्रस्तावांची माहिती जनतेपर्यंत घेऊन जा असे खा. चव्हाण म्हणाले.

  यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांना सिंचन सुविधा देण्यासाठी मुबारकपूरनजीक वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्पाची सुरुवात काँग्रेस सरकारने केली या प्रकल्पामुळे १७ गावातील पाच हजार ६६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पण शासन निधी देत नसल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल ३४ कोटींचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. यवतमाळ शहराला वीस दिवसांत एकदा पाणी मिळते. शेतकरी, कष्टकरी, दलित, महिला, आदिवासी, विद्यार्थी, तरूण यापैकी समाजातील एकही घटक सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात संघर्ष करा. शेतक-यांच्या शेतमाला हमी भाव आणि तरूणांच्या हाताला काम फक्त काँग्रेस सरकारच देऊ शकते त्यामुळे देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

  या शिबिराला विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, आ. हरिभाऊ राठोड, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आ. वामनराव कासावार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, संध्याताई सव्वालाखे, एनएसयुआय चे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, महिला जिल्हाध्यक्षा माधुरीताई अराटे यांनीही मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ यांनी सोशल मिडीयाचे सादरीकरण केले.

  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरीताई आडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल ठाकरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145