भाजपाचे कार्यकर्ते हनुमंत : पालकमंत्री

Advertisement

रामटेक विधानसभेचा झंझावाती दौरा -पारशिवनी, आमडी, नगरधन, रामटेक येथे विजय संपर्क सभा

नागपूर: भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या ताकदीची आठवण करून द्यावी लागते. हनुमंताला जेव्हा त्यांच्या ताकदीची आठवण करून दिली, त्यानंतरच लंकादहन झाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही हनुमंताप्रमाणेच आहे. त्यांच्यातच भाजपाचा आमदार निवडून आणण्याची हनुमंतासारखी क्षमता असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

रामटेक विधानसभेच्या झंझावाती दौर्‍यादरम्यान आमडी येथे बुथप्रमुख, शक्तिप्रमुख व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी संपूर्ण दौर्‍यात आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्ह्याचे महामंत्री अविनाश खळतकर, सदानंद निमकर, संजय मुलमुले, कमलाकर मेंघर, प्रकाश वांढे, विजय हटवार, विस्तारक राम मुंजे आदी उपस्थित होते. रामटेक येथील सभेला विवेक तोतडे, विकास तोतडे, ज्ञानेश्वर ढोक, राजेश ठाकरे, दिलीप देशमुख, श्रीमती शिल्पा रणदिवे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी कमळावर रिंगणात असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करताना सांगितले की, 70 वर्षात जे होऊ शकले नाही, तो पंतप्रधान मोदींनी 370 कलम हटवून 3 महिन्यात करून करून दाखवले. काश्मीर आपले असतानाही ते आपले वाटत नव्हते. आता काश्मीरसह भारत एकसंध झाला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असल्याचे सार्‍या जगाने स्वीकारले आहे.

तसेच नागपूर जिल्ह्याला गेल्या 15 वर्षात न्याय मिळाला नाही. पण मागील 5 वर्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने न्याय दिला. 70 लाख लोकसंख्येला काँग्रेसचे सरकार फक्त 220 कोटी देत होते. फडणवीस सरकारने मात्र 770 कोटी रुपये देऊन या जिल्ह्याला न्याय दिला. आता कुणीही ही रक्कम कमी करू शकत नाही. शेतकर्‍यांचे उत्पादन वाढून त्यांची आर्थिक स्थित अधिक मजबूत करण्याचा प्र्रयत्न या शासनाने केला असल्याचे सांगून कन्हान नदी आता तोतलाडोहमध्ये आणण्याच्या प्रकल्पाला या शासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे 3 हजार कोटींचा हा प्रकल्प होणार असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची सोय होणार आहे. निवडणुकीपर्यंत कार्यकर्त्यांना आता प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.
आ. मल्लिकार्जुन रेड्डी

सन 2015 प्रमाणे यावेळीही कार्यकर्त्यांनी कमळाला मतदान करून निवडून देण्याचे आवाहन करताना आ. मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले- रामटेकचा चौफेर विकास हा मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्यामुळे झाला. सुमारे 200 कोटी रुपये या मतदारसंघाला त्यांनी दिले. आम्ही भूमिपूजने केलेली कामे अजून सुरु आहेत. भूमिपूजन करून पळून जाणार्‍यातील आम्ही नाही. रामटेक लोकसभेत आम्ही मित्र पक्षाचा खासदार निवडून दिला तसेच आता विधानसभेत मात्र भाजपाच्या आमदाराला निवडून द्यावे लागणार आहे, याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा. कार्यकर्तेच आमची शक्ती असून त्यांची मेहनतच या मतदारसंघातून कमळाला निवडून देऊ शकते, असेही ते म्हणाले.